नवीन पार्किंग धोरणाचा, ठाणे महापालिकेला आधार; वर्षाकाठी मिळणार कोट्यवधींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 09:45 AM2021-05-14T09:45:30+5:302021-05-14T10:13:54+5:30

रस्त्यावरील वाहतूक सुरळीत व्हावी, वाहतूककोंडीतून नागरिकांची सुटका व्हावी, या उद्देशाने ठामपाने आठ वर्षांपूर्वी स्मार्ट पार्किंग धोरण राबविण्याचा निर्णय घेतला.

New parking policy, support to Thane Municipal Corporation; Billions of rupees will be received for the year | नवीन पार्किंग धोरणाचा, ठाणे महापालिकेला आधार; वर्षाकाठी मिळणार कोट्यवधींचा निधी

नवीन पार्किंग धोरणाचा, ठाणे महापालिकेला आधार; वर्षाकाठी मिळणार कोट्यवधींचा निधी

googlenewsNext

 
ठाणे : कोरोनामुळे आर्थिक स्थिती नाजूक झाल्याने ठाणे महापालिकेने आता उत्पन्नाचे नवनवे पर्याय निवडण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जुने स्मार्ट पार्किंग धोरण फाइलबंद करून आता नवीन धोरण अमलात आणण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. या धोरणामुळे रस्त्यावरील वाहतुकीला शिस्त लागणार आहे. वाहतूककोंडी कमी होण्याबरोबर मनपाच्या तिजोरीत वर्षाकाठी कोट्यवधींचा निधी जमा होईल, असा दावा मनपाने केला आहे. नवीन धोरणासाठी मनपाला कोणताही आर्थिक भार सहन करावा लागणार नाही. यासंदर्भातील प्रस्ताव १९ मेच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे.

रस्त्यावरील वाहतूक सुरळीत व्हावी, वाहतूककोंडीतून नागरिकांची सुटका व्हावी, या उद्देशाने ठामपाने आठ वर्षांपूर्वी स्मार्ट पार्किंग धोरण राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार यातून शहरातील १७७ रस्त्यांवर ९,८५५ वाहने उभी करण्याची सुविधा मिळणार होती. रस्त्यांची अ, ब, क आणि ड अशी वर्गवारी करून वाहनांसाठी शुल्क आकारले जाणार होते. 

मनपाला या योजनेसाठी १८ कोटींचा खर्च करावा लागणार होता. तर कंत्राटदार उत्पन्नातील काही वाटा मनपाला देणार होता. या कामाकरिता १५ वर्षांसाठी निविदा काढली होती. त्यास महासभेनेही मंजुरी दिली होती; परंतु निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने अखेर ती रद्द करण्यात आली.



आता पुन्हा नव्याने पार्किंग धोरण राबविण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. त्यासाठी प्रभाग समिती स्तरावर पुन्हा सर्वेक्षण केले आहे. शहरातील नवीन उड्डाणपूल, मेट्रो पूल येथे मूळ योजनेत वाहनतळ होते. ते नव्या सर्वेक्षणानंतर रद्द केले आहेत. तसेच नवीन रस्ते आणि रुंंदीकरण झालेल्या रस्त्यांवर वाहनतळ निर्माण करण्यासाठी प्रभाग समिती स्तरावर स्थानिक शहर वाहतूक विभागाच्या मदतीने सर्वेक्षण पूर्ण केले आहे. या सर्वेक्षणानुसार मनपाने पार्किंग धोरणाचा नवा प्रस्ताव तयार केला आहे. 

त्यानुसार आता परंपरागत पद्धतीने रस्त्यावर सशुल्क पार्किंग धोरण राबविण्यात येणार आहे. नव्या धोरणात १६८ रस्ते असून, या सर्वच रस्त्यांवर ११ हजार ९३१ वाहने उभी करण्याची सुविधा निर्माण केली जाणार आहे. आधीच्या धोरणात ही संख्या कमी होती. 

यामध्ये ६,४७४ दुचाकी, १,५४६ तीनचाकी, ३,३६० हलकी चारचाकी, ५४८ अवजड चारचाकी वाहनांची पार्किंग येथे होऊ शकणार आहे. त्यानुसार आता हा प्रस्ताव मंजुरीसाठी महासभेच्या पटलावर ठेवला आहे.
 

Web Title: New parking policy, support to Thane Municipal Corporation; Billions of rupees will be received for the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.