अंबरनाथ रासायनिक प्रदूषणाचा "नवा पॅटर्न"
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:43 AM2021-05-20T04:43:50+5:302021-05-20T04:43:50+5:30
अंबरनाथ : अंबरनाथ एमआयडीसीत दररोज प्रदूषणाच्या नवनव्या सुरस कथा ऐकायला मिळतात. आता एका रासायनिक कंपनीचा असाच एक नवीन जुगाड ...
अंबरनाथ : अंबरनाथ एमआयडीसीत दररोज प्रदूषणाच्या नवनव्या सुरस कथा ऐकायला मिळतात. आता एका रासायनिक कंपनीचा असाच एक नवीन जुगाड समोर आला आहे. या कंपनीतले सांडपाणी प्रक्रिया न करताच थेट डोंगरावर फवारले जात आहे. मात्र, यामुळे निसर्गाची हानी होत असून याकडे कुणाचेही लक्ष नाही.
अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीत डीजीकेम नावाची कंपनी असून याच कंपनीतील व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने या कंपनीचा हा कारनामा सर्वांसमोर आला आहे. या कंपनीत तयार होणारे रासायनिक सांडपाणी प्रक्रिया करून सीईटीपी प्लान्टमध्ये न सोडता थेट कंपनीच्या मागच्या बाजूला असलेल्या एका डोंगरावर फवारले जात आहे. कंपनीतून मोटार लावून पाइप टाकून हे पाणी डोंगरापर्यंत नेले जाते आणि तिथे थेट झाडाझुडपांवर फवारले जाते. याच भागातून अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चिखलोली धरणाचा उगम आहे. त्यामुळे यातून पर्यावरणाच्या ऱ्हासासह नागरिकांच्या जीवाशीसुद्धा खेळ सुरू आहे. स्थानिक रहिवासी अनिल भोईर यांनी हा प्रकार सुरू असताना त्याचे चित्रीकरण करून पुराव्यांसह प्रदूषण नियंत्रण मंडळाला तक्रार केली. मात्र, अजूनही एमपीसीबीने काहीही हालचाल केलेली नाही. त्यामुळे या प्रदूषणकारी कंपन्यांवर कारवाई करण्यासाठी आता खुद्द पर्यावरणमंत्र्यांनीच लक्ष घालण्याची गरज व्यक्त होत आहे.
----------------------------------------------