डोंबिवली रेल्वे स्थानकात नवा रेल्वे पादचारी पूल होणार, जैन यांची स्थानकाला भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 06:04 PM2018-09-21T18:04:23+5:302018-09-21T18:05:02+5:30
दोन महिन्यात कामाला होणार सुरूवात, स्वच्छतेसाठी प्रचंड काम करण्याचे डिआरएम जैन यांचे आदेश
डोंबिवली: सर्वाधिक गर्दीचे रेल्वे स्थानक अशी ख्याती असलेल्या डोंबिवलीरेल्वे स्थानकातील कल्याण दिशेकडील पादचारी पूल जूना झाला असून त्या जागी नवा पादचारी पूल तयार करण्याची आवश्यकता आहे. त्यासंदर्भात मध्य रेल्वे प्रशासनाचा निर्णय झाला असून आगामी दोन महिन्यात नव्या पूलाच्या कामाला सुरूवात केली जाणार आहे. नवा पूल तयार झाल्यानंतरच सध्याचा जूना पूल तोडण्यात येईल असेही विभागीय व्यवस्थापक संजयकुमार जैन यांनी स्पष्ट केले.
जैन यांनी शुक्रवारी डोंबिवली रेल्वे स्थानकाचा पाहणी दौरा केला, त्यावेळी त्यांनी स्थानकातील पाचही फलाटांची सुमारे दोन तास पाहणी केली. नवा पादचारी पूल जूनपर्यंत पूर्ण व्हावा असा रेल्वेचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. रेल्वे प्रशासनाचा हा अंतर्गत दौरा असल्याने या दौ-यात कोणत्याही राजकीय नेत्यांना सामावण्यात आले नसल्याचीही माहिती देण्यात आली. अंतर्गत कामाचा एक भाग म्हणुन हा पाहणी दौरा झाला, त्यामध्ये महाव्यवस्थापकांच्या आदेशांनूसार स्वच्छतेला प्राधान्य देण्यात आले होते. फलाट क्रमांक १ ते ५ वरील कल्याण दिशेकडून, मधला पादचारी पूल, मुंबई दिशेकडील पादचारी पूल, स्थानकातील सर्व प्रवेशद्वार, तिकिट खिडक्या, तिकिट घर आदींचा परिसर, स्वच्छतागृहे, पादचारी पूलांच्या पाय-या आदींसह पाणपोया, स्वयंचलीत जीने या सगळयाची जैन यांनी पाहणी केली. त्या दरम्यान त्यांनी स्वच्छता राखण्यासंदर्भात स्थानक मॅनेजर, सफाई अधिकारी, कर्मचारी आदींना सूचित केले. स्वच्छता राखली जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. स्थानकातील सर्व प्रवेशद्वारांवरही विशेष स्वच्छता हवी. भिकारी, गर्दुल्ले नसावेत, तसेच फेरीवाला असण्याचा प्रश्नच येत नसल्याचे त्यांनी आदेशीत केले. स्वच्छतागृहांसंदर्भात ज्यांनी ते चालवण्याची जबाबदारी घेतली आहे त्या सगळयांना मुता-या, संडास स्वच्छ ठेवणे, दुर्गंधी न येऊ देणे, घाण नसणे अशा सूचना देऊन काम करुन घेण्याबाबत सांगण्यात आले. स्थानकातील इंडिकेटर्स, पंखे, दिवे सुस्थितीत ठेवणे आवश्यक असून पत्र्यांवरही स्वच्छता असावी असेही त्यांनी सांगितले. फलाटांमध्ये जेथे उपहारगृह आहेत त्या चालकांसमवेत बैठक घेऊन अस्वच्छता दिसल्यास, तक्रारी आल्यास कारवाई अटळ आहे हे स्पष्ट नीर्देशीत करण्यासंदर्भातही त्यांनी सूचना दिल्या. त्यावेळी त्यांच्यासमवेत अभियांत्रिकी विभागाचे वरिष्ठ अभियंते, रेल्वे पोलिस दलाचे डोंबिवलीचे अधिकारी आर.के.मिश्रा, लोहमार्ग पोलिस अधिकारी आणि अन्य अधिकारी विशेषकरून उपस्थित होते. प्रवेशद्वारांबाहेरील रेल्वे हद्द सोडल्यावर कल्याण डोंबिवली महापालिकेची हद्द सुरू होते, त्यांच्या हद्दीत घाण असेल तर त्यासंदर्भात महापालिका आयुक्तांशी पत्रव्यवहार करा, बैठक करा आणि स्वच्छता राखणे, गैरसोयी दूर करणे यासंदर्भात चर्चा करून त्यांना निर्णयांची अंमलबजावणी करायला सांगा असेही जैन यांनी रेल्वे अधिका-यांना सूचित केले.
ये दिल मांगे मोअर -जैन
स्वच्छतेसाठी डोंबिवली स्थानकात ३८ सफाई कर्मचारी तैनात करण्यात आले असून ७ स्वच्छतेची यंत्रे कार्यरत आहेत. त्या सगळयांवर देखरेखीसाठी ३ सुपरवायझर नेमण्यात आले आहेत. २ आॅक्टोबर रोजी महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतिचे औचित्य साधून बहुतांशी रेल्वे स्थानकांमध्ये स्वच्छता राखण्यासाठी रेल्वेचा प्रयत्न आहे. त्यासाठी प्रवाशांनी, महापालिकेने देखिल सहकार्य करावे असे आवाहन जैन यांनी केले. ये दिल मांगे मोअर त्यामुळे स्थानकातील सध्याच्या स्वच्छतेवर समाधानी नसल्याचे सांगत जैन यांनी आगामी काळात होणारे स्वच्छतेचे बदल आपण सगळे अनुभवालच असे म्हंटले.
* सध्याचा कल्याण दिशेकडील पादचारी पूल हा जाणकारांच्या माहितीनूसार १९८० च्या दशकामध्ये बांधण्यात आला. वर्षांगणीक या स्थानकातून प्रवास करणा-या प्रवाशांची संख्या ही लाखोंनी वाढली. तसेच पूर्व पश्चिम शहरात ये जा करण्यासाठी लाखो डोंबिवलीकर या पादचारी पूलांचा वापर करतात. वेळोवेळी त्याची डागडुजीही झाली असली तरीही आता त्या पूलाचे आर्युमान संपुष्टात आले आहे, त्यामुळे त्या बाजुला नवा पादचारी पूल बांधण्याची आवश्यकता असल्याने रेल्वे प्रशासनाने त्याची तरतूद केली आहे. नवा पूल झाल्यावर तातडीने सध्याचा जूना पूल तोडण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एलफीस्टन स्थानकातील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवली स्थानकाचा पाहणी दौरा केला होता, त्यावेळी त्यांनीही कल्याण दिशेकडील पूलावरून नागरिकांनी गर्दीच्या वेळेत ये-जा करू नये असे आवाहन रेल्वेने करावे , बोर्ड लावावेत, जनजागृती करावी असे सांगितले होते. त्यानूसार आरपीएफ अधिकारी आर.के.मिश्रा यांनी तातडीने फलक लावून प्रवाशांना आवाहन केले होते.