ठाणे प्रदूषणाच्या विळख्यातून बाहेर पडेपर्यंत लोकवस्तीच्या ठिकाणी नव्याने आरएमसी प्लांट उभारण्यास परवानगी नाकारावी

By अजित मांडके | Published: November 3, 2023 12:59 PM2023-11-03T12:59:31+5:302023-11-03T12:59:50+5:30

राष्ट्रवादी ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांची मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे मागणी

New RMC plant in populated areas until Thane comes out of pollution trap | ठाणे प्रदूषणाच्या विळख्यातून बाहेर पडेपर्यंत लोकवस्तीच्या ठिकाणी नव्याने आरएमसी प्लांट उभारण्यास परवानगी नाकारावी

ठाणे प्रदूषणाच्या विळख्यातून बाहेर पडेपर्यंत लोकवस्तीच्या ठिकाणी नव्याने आरएमसी प्लांट उभारण्यास परवानगी नाकारावी

ठाणे : ठाणे शहरामध्ये दिवसेंदिवस खालावत चाललेल्या हवेच्या गुणवत्तेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे लोकवस्तीच्या ठिकाणी असलेल्या आरएमसी प्लांटमध्ये होत असलेल्या सिमेंटचा वापर. यामुळे लोकवस्तीच्या ठिकाणी नव्याने आरएमसी प्लांट उभारण्यास परवानगी नाकारावी, अशी मागणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे केली आहे.

दिल्लीप्रमाणे मुंबई तसेच मुंबईलगत असलेल्या ठाणे शहरामध्ये देखील हवेची गुणवत्ता खालावत चालली असून त्यामुळे दिवसेंदिवस प्रदूषणामध्ये वाढ होत आहे. प्रदूषणवाढीसाठी महत्वाचे कारण असलेल्या मोठ-मोठ्या अनेक इंडस्ट्रीज सध्या बंद झाल्या आहेत. परंतु शहरामध्ये बांधकाम उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून इमारत उभारणीसाठी मोठ-मोठ्या कॉम्प्लेक्समध्ये आरएमसी चे प्लांट उभारण्यात येतात. यामध्ये सिमेंटचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असतो. त्यामुळे सिमेंटसारख्या सर्वात कमी मायक्रॉनचे धूलीकण, त्यासोबत वाळू तसेच खडी यांचे धूलीकण, हे हवेत मिसळल्याने धुरके तयार होते आणि ज्या ठिकाणी हे आरएमसी प्लांट उभारण्यात येतात त्या परीसरामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदूषणाची समस्या निर्माण होते.

आरएमसी प्लांटधारक हा केवळ ज्या कॉम्प्लेक्ससाठी तो प्लांट उभारण्यात आला आहे त्यासाठी त्याचा वापर न करता बाहेर देखील त्या मालाची विक्री करताना दिसत आहे. त्यामुळे वारंवार रस्त्यावर फिरणारी आरएमसी ची वाहने, त्यामधून निघणारे धुलीकण हे देखिल प्रदूषणाला कारणीभूत ठरत आहेत. याचा परिणाम, ज्या परिसरामध्ये हे प्लांट उभारण्यात येतात त्या परीसरातील नागरिकांना श्वसनाच्या तसेच इतर आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागते, अशी माहिती त्यांनी दिली.

आरएमसी प्लांट उभारण्यासाठी अनेक परवानग्यांची आवश्यकता असते. त्यानुसार प्लांटधारकाने संबंधित महानगरपालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ, जल (प्रतिबंधक व नियंत्रण) कायदा १९७४ नुसार परवानगी घेतली आहे का ? याची तपासणी होणे अत्यंत आवश्यक आहे. यापूर्वी दररोज ठाणे महानगरपालिकेमार्फत हवेची गुणवत्ता, डिस्प्ले केली जायची. ती देखिल सध्या कुठे दिसत नाही. त्यामुळे ठाणे शहरामध्ये प्रदूषण यंत्रणेची काय व्यवस्था आहे हेच कळेनासे झाले आहे. एकीकडे मुंबईसह ठाणे शहरामध्ये खालावत चाललेली हवेची गुणवत्ता आणि दुसरीकडे शहरामध्ये राजरोजपणे सुरु असलेल्या आरएमसी प्लांटमुळे होत असलेले प्रदूषण यामुळे नागरीक खूप त्रस्त आहेत.

याकडे दुर्लक्ष न करता जनतेला हवेच्या प्रदूषणाच्या विळख्यात अडकविणे म्हणजे नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यासारखे आहे. या प्रकरणी आपण जातीने लक्ष घालून ठाणे महानगरपालिकेच्या प्रदूषण विभागाला, जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून विचार करता योग्य ती खबरदारी घेण्याचे आदेश द्यावेत. तसेच हवेच्या प्रदूषणाला कारणीभूत ठरणारे आरएमसी प्लांट ज्या-ज्या ठिकाणी सुरु असतील त्या ठिकाणी संबंधीत प्लांट धारकाने आवश्यक त्या सर्व परवानग्या घेतल्या आहेत का? त्याला काम सुरु असलेल्या कॉम्प्लेक्सच्या व्यतिरीक्त बाहेर माल विकण्याची परवानगी आहे का ? याची तपासणी करावी. तसेच जोपर्यंत ठाणे शहर प्रदूषणाच्या विळख्यातून बाहेर पडत नाही तोपर्यंत लोकवस्तीच्या ठिकाणी नव्याने आरएमसी प्लांट उभारण्यासाठी परवानगी देण्यात येऊ नये, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: New RMC plant in populated areas until Thane comes out of pollution trap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.