भाईंदरच्या नवघरमध्ये साकारणार नवीन तरणतलाव; स्थानिक जलतरणपटूंची होणार सोय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2017 05:01 PM2017-10-13T17:01:15+5:302017-10-13T17:02:05+5:30
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या एकमेव क्रिडा संकुलामध्ये साकारण्यात आलेले तरणतलाव अद्याप सुरु झाले नसले तरी त्याला पर्याय म्हणून नवघरमध्ये पालिकेच्या आरक्षित नागरी सुविधा भूखंडावर नवीन तरणतलाव लवकरच साकारण्यात येणार आहे.
- राजू काळे
भार्इंदर, दि. १३ - मीरा-भार्इंदर महापालिकेच्या एकमेव क्रिडा संकुलामध्ये साकारण्यात आलेले तरणतलाव अद्याप सुरु झाले नसले तरी त्याला पर्याय म्हणून नवघरमध्ये पालिकेच्या आरक्षित नागरी सुविधा भूखंडावर नवीन तरणतलाव लवकरच साकारण्यात येणार आहे. यामुळे स्थानिक जलतरणपटूंची सोय होणार असली तरी तूर्तास या नवीन तरणतलावाचा प्रस्ताव आयुक्त डॉ. नरेश गीते यांच्या मान्यतेत अडकला आहे.
तत्पुर्वी दहिसर चेकनाका परिसरात भव्य गृहसंकुल बांधणा-या लोढा बिल्डरला २०११-१२ दरम्यान बांधकाम परवानगीपोटी पालिकेला सुमारे ७ हजार चौरस मीटर जागा नागरी सुविधा भुखंडाच्या माध्यमातून प्राप्त झाली. त्यावेळी त्या जागेवर बिल्डरच्याच प्रस्तावानुसार पालिकेने खाजगी शाळा बीओटी तत्वावर सुरु करण्याची परवानगी दिली. त्यापोटी महिन्याला सुमारे १ लाख २० हजार रुपये भाडे पालिकेला देण्याचे निश्चित करण्यात आले. ही जागा बिल्डरच्या घशात न घालता ती नागरिकांच्या उपयोगासाठी आणून त्यावर आॅलिम्पिक दर्जाचे तरणतलाव बांधण्याची मागणी आ. प्रताप सरनाईक यांनी प्रशासनाकडे लावून धरली. त्यावर अनेकदा आंदोलने झाली. तर बिल्डरने पालिकेकडून आकारण्यात आलेले भाडे अवास्तव असल्याचे कारण पुढे करीत ते कमी करण्याची मागणी केली. त्याला अमान्य करीत त्यावेळचे आयुक्त (निवृत्त) शिवमुर्ती नाईक यांनी त्या जागेवरील खाजगी शाळेचा प्रस्ताव रद्द केला. यानंतर आयुक्तपदावर प्रभारी म्हणून रुजू झालेले सुधीर राऊत (निवृत्त) यांनी पुन्हा त्या प्रस्तावाला मान्यता दिली. याविरोधात सेनेचे माजी नगरसेवक प्रशांत पालंडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असले तरी दरम्यान बिल्डरने पालिकेला नियोजित तरणतलावासाठी नवीन जागा प्रस्तावित केली. परंतु, ती जागा अपुरी तसेच ती तरणतलावासाठी योग्य नसल्याने ती नाकारण्यात आली. यामुळे शहराला लाभणाय््राा एकमेव तरणतलावाचे स्वप्न भंगले. यानंतर पालिकेने २०१४ मध्ये बांधलेल्या एकमेव क्रिडा संकुलात नवीन तरणतलाव साकारण्यात आले. परंतु, क्रिडा संकुलच अद्याप सुरु न झाल्याने त्यातील तरणतलाव वापराविनाच पडून आहे. दरम्यान भार्इंदर पुर्वेकडीलच नवघर परिसरात असलेल्या आरक्षण क्र. १०९ वरील नागरी सुविधा भूखंडावर नवीन तरणतलाव साकारण्याचा प्रस्ताव नगरसेवक दिनेश नलावडे यांनी पालिकेकडे सादर केला. येथील लोकमान्य टिळक सामाजिक हॉलच्या बाजूला असलेल्या भूखंडावर प्रस्तावित तरणतलाव साकारण्यात येणार असुन प्रशासनाने त्यासाठी चालू अंदाजपत्रकात २ कोटींची तरतुद करण्यात आली आहे. हा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असला तरी त्यावर आयुक्तांची मान्यता महत्वाची ठरणार आहे. आयुक्तांनी प्रस्तावाला मान्यता दिल्यास त्या तरणतलावाचा आर्थिक व प्रशासकीय प्रस्ताव प्रशासनाकडुन महासभेच्या मान्यतेसाठी सादर करावा लागणार आहे. महासभेची मान्यता मिळताच त्या भूखंडावर विनासायास तरणतलाव साकारला जाणार आहे. तसेच हा तरणतलाव नवघर येथील सरस्वतीनगरमध्ये असलेल्या स्व. यशवंतराव चव्हाण उद्यान व सचिन तेंडुलकर मैदानालगतच प्रस्तावित करण्यात आला आहे. या मोठ्या लोकवस्तीच्या परिसरात एकही तरणतलाव नसल्याने तो तेथील जलतरणपटूंसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे मत नलावडे यांनीन व्यक्त केले.