नवा ठाकुर्ली पूल दिवाळीत

By admin | Published: June 26, 2017 01:36 AM2017-06-26T01:36:09+5:302017-06-26T01:36:09+5:30

डोंबिवली-ठाकुर्ली या दोन्ही शहरांचे पूर्व-पश्चिम मार्ग जोडण्यात महत्त्वाचा दुवा ठरणाऱ्या पुलाच्या कामासाठी रेल्वेने तब्बल सहा तासांचा मेगाब्लॉक

New Thakurli Pool in Diwali | नवा ठाकुर्ली पूल दिवाळीत

नवा ठाकुर्ली पूल दिवाळीत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : डोंबिवली-ठाकुर्ली या दोन्ही शहरांचे पूर्व-पश्चिम मार्ग जोडण्यात महत्त्वाचा दुवा ठरणाऱ्या पुलाच्या कामासाठी रेल्वेने तब्बल सहा तासांचा मेगाब्लॉक दिल्याने दिवाळीत या पुलाची एक मार्गिका खुली होणार आहे. कल्याणच्या दिशेने रेल्वेला समांतर जाणाऱ्या मार्गिकेची निविदाच अद्याप न काढल्याने तो मार्ग मात्र रखडण्याची चिन्हे आहेत. मात्र पुलाचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यावर ठाकुर्लीतील रेल्वे फाटक बंद होईल. त्यातून रस्त्यावरील वाहतुकीला तर गती येईलच. शिवाय रेल्वे वाहतुकीचा खोळंबाही टळेल.
डोंबिवली-ठाकुर्ली रेल्वे स्थानकांदरम्यान जलाराम मंदिर परिसरात उड्डाणपूल बांधला जात आहे. त्यालाच जोडून डोंबिवली पूर्वेला ठाकुर्ली ते कल्याणच्या दिशेने उड्डाण मार्ग तयार केला जाणार आहे. त्याच्या गर्डरच्या कामासाठी सहा तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला. या पुलाच्या कामासाठी दोन गर्डर टाकले जाणार होते. पण त्यातील पहिल्या गर्डरचे कामच विलंबाने पूर्ण झाले. त्यामुळे ९ जुलैला दुसरा मेगाब्लॉक घेऊन हे काम पूर्ण होईल. त्यामुळे ठाकुर्ली ते डोंबिवली ही मार्गिका आधी सुरू होईल. दिवाळीपर्यंत पुलावरून वाहतूक सुरु होणार असल्याची माहिती राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.
ठाकुर्ली रेल्वे स्थानकाच्या विस्तारीकरणानंतर तेथील फाटक बंद करण्यावर रेल्वेने लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी आणि ठाकुर्ली, डोंबिवलीतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पालिकेने ठाकुर्ली ते कल्याण असा उड्डाण रस्ता प्रकल्प तयार केला आहे. त्यासाठी ठाकुर्ली पश्चिमेतील ५२ चाळ ते पूर्वेतील जलाराम मंदिराच्या दिशेने उड्डाणपूल बांधला जाणार आहे. त्या कामाची पाहणी करण्यासाठी राज्यमंत्री उपस्थित होते. तेव्हा त्यांनी हा तपशील पुरवला. शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनीही महापौर राजेंद्र देवळेकर, सभागृह नेते राजेश मोरे, नगरसेवक दीपेश म्हात्रे यांच्या उपस्थितीत पाहणी केली.

या पुलाचे काम झाल्यावर पूर्व-पश्चिमेला जाणारी निम्मी वाहतूक तेथून वळवली जाईल. प्रसंगी अवजड वाहने तेथून जातील. त्यामुळे सध्याच्या पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या रामनगरमधील पुलावरील ताण कमी होईल.
तसेच त्याला लागून असलेल्या टंडन रस्त्यावर सतत होणारी वाहतूक कोंडी दूर होईल, असा वाहतूक विभागातील अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.

नवी मुंबईतील क्रेनचा वापर
रेल्वेमार्गावरून जाणाऱ्या गर्डरचे वजन १७० टन आहे. तो टाकण्यासाठी रेल्वे प्रशासनाने नवी मुंबईतून मोठी क्रेन मागवली होती. ती ठाकुर्ली पूर्वेत उभी करण्यात आली. ५२ चाळीच्या दिशेने टॅ्रक तयार करुन त्यावरुन हायड्रोलिक पद्धतीने गर्डर सरकविला जात होता. तो गर्डर ४६.७ मीटर लांबीचा आहे. रेल्वेचे काम सगळ््यात मोठे काम असल्याने तेथे त्यांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रेल्वेकडून २०० पेक्षा जास्त कर्मचारी कामाच्या ठिकाणी कार्यरत होते. दुपारी एक वाजताच्या सुमारास हायड्रोलिक यंत्रणेत स्पार्किंग होत असल्याने अर्ध्या तासासाठी काम खोळंबले. त्यामुळे जलद मार्गावरील वाहतूक तासभर उशिरा म्हणजे दुपारी दोन वाजता सुरू झाली आणि धीम्या मार्गावरील वाहतूक दुपारी तीनच्या सुमारास सुरू झाली. गर्डरचे काम मात्र त्यानंतरही सुरू होते. पावसाचा जोर ओसरल्यावर या कामाला वेग आला. या मेगाब्लॉकवेळी ठाकुर्ली ते कल्याणदरम्यान स्लीपर बदलण्याचेही काम रेल्वेने केले.

Web Title: New Thakurli Pool in Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.