नवीन ठाण्याचा प्रस्ताव फक्त बिल्डरांच्या फायद्यासाठीच, आ. जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 06:31 PM2018-11-14T18:31:50+5:302018-11-14T18:32:00+5:30

खारबाव, पायगाव, पाये, शिलोत्तर, मालोडी, नागरे आदी गावांमध्ये बिल्डरांनी शंभर-शंभर एकरच्या जमिनी 10 वर्षांपूर्वीच विकत घेऊन ठेवल्या आहेत.

New Thane proposal is for the benefit of the builders only. The charges of Jitendra Awhad | नवीन ठाण्याचा प्रस्ताव फक्त बिल्डरांच्या फायद्यासाठीच, आ. जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

नवीन ठाण्याचा प्रस्ताव फक्त बिल्डरांच्या फायद्यासाठीच, आ. जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

Next

ठाणे- शहरापासून जवळ असलेल्या खारबाव, पायगाव, पाये, शिलोत्तर, मालोडी, नागरे आदी गावांमध्ये बिल्डरांनी शंभर-शंभर एकरच्या जमिनी 10 वर्षांपूर्वीच विकत घेऊन ठेवल्या आहेत. या बिल्डर लॉबीचा फायदा व्हावा, यासाठी ठाणेकर मूलभूत सुविधांपासून वंचित असताना कोट्यवधी रुपये खर्च करुन नवीन ठाण्याचा प्रस्ताव आणण्यात आला आहे, असा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. या प्रस्तावाला पालिकेच्या सभागृहात तसेच रस्त्यावरही आम्ही विरोध करु, असा इशाराही आ. आव्हाड यांनी दिला. घरचं झालं थोडं आणि व्याह्याने धाडलं घोडं, अशीच अवस्था सध्या ठामपा आणि सत्ताधार्‍यांची झाली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

ठाणे शहरापासून जवळ असलेल्या खारबाव, पायगाव, पाये, शिलोत्तर, मालोडी, नागरे या महसुली गावांचा विकास आता येत्या काळात शक्य होणार आहे. या गावांचा समावेश नवीन ठाणेमध्ये करून या भागाचे विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून ठाणे महापालिका व एमएमआरडीए यांची संयुक्त नेमणूक केली जाणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव 19 नोव्हेंबरच्या महासभेत ठाणे महापालिकेने मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे. त्यासंदर्भात आपली भूमिका मांडण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आ. आव्हाड यांनी हा आरोप केला. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे हेदेखील उपस्थित होते.

आ. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, ठाणे शहरात मूलभूत समस्यांची वानवा आहे. केवळ 199 कोटी रुपये शासनाला देऊन शाई धरण विकत घेता येणार आहे. मात्र, पालिका ते काम करण्याऐवजी भिवंडीला लागून असलेल्या गावांना ठाणे महानगर पालिकेमध्ये सामावून घेऊन नवीन ठाण्याचा प्रस्ताव आणत आहे. आज ठाण्याला पाणीपुरवठा करणार्‍या धरणांमधील पाण्याचा साठा कमी झाला आहे. त्यामुळे आगामी काळात आठवड्यातून दोन वेळा पाणी कपात केली जाणार आहे. आज घोडबंदरला टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. वागळे इस्टेटमध्ये पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. दिवावासयि कचर्‍याच्या दुर्गंधीने हैराण झाले आहेत. त्यांना आठवड्यातून दोन तीन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवला जात आहे. याला जबाबदार ठाण्याचे सत्ताधारीच आहेत.

ठाणेकर त्यांच्यावर प्रेम करतात म्हणून त्यांना सत्ता मिळते, असा त्यांचा दावा असला तरी हे एकतर्फी प्रेम असून सत्ताधारी शिवसेनेचे ठाण्यावर प्रेमच नाही. त्यामुळे हे एकतर्फी प्रेम ठाणेकरांसाठी घातक ठरत आहे. दर दहा माणशी एक शौचालय असावे, अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. मात्र, ही निकड पूर्ण करण्यात पालिका प्रशासन आणि सत्ताधार्‍यांना शक्य झालेले नाही. आजही आमच्या मायभगिनी पहाटे पाच वाजता शौचालयास जात आहेत, ही लाजिरवाणी बाब आहे. या समस्या सोडवण्याऐवजी नवीन ठाणे उभारण्याचा घाट का घातला गेला आहे. जे जुणे ठाणे आहे, ते सांभाळता येत नाही. आता नव्याने हिरानंदानीसह दोस्ती, लोढा यांच्या विकासासाठी नवीन ठाण्याचा हा प्रस्ताव आणण्यात आला आहे. मागील दहा वर्षापूर्वीच बिल्डरांनी हा कट रचला होता. भिवंडी पालिकेला लागून असलेल्या या गावांमधील जमिनी बिल्डरांनी विकत घेतल्या आहेत. कवडीमोल किमतीत विकत घेतलेल्या या जमिनींवर नवीन ठाणे उभारायचे असेल तर सातबारावरील सर्व फेरफार रद्द करुन त्या जमिनी ताब्यात घ्याव्यात; साडेबारा टक्क्यांचा हिशोब लावून त्या जमिनी शेतकर्‍यांना परत द्याव्यात; सिडकोच्या धर्तीवर स्वतंत्र प्राधिकरण निर्माण करुन नवीन ठाण्याचा विकास करावा, त्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. या प्रस्तावाला आम्ही विरोध करणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.

पारदर्शी मुख्यमंत्र्यांनी 3 हजार कोटी द्यावेत
जर एमएमआरडीए आणि ठाणे पालिकेला या गावांच्या विकासाचा एवढाच पुळका आला असेल तर त्यांनी ज्या प्रमाणे कडोंमपामध्ये ग्रोथ सेंटर उभारण्यासाठी 6 हजार 500 कोटींच्या पॅकेजची घोषणा केली होती. त्याच धर्तीवर मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी यावेळी आनंद परांजपे यांनी केली. मात्र, कल्याण-डोंबिवलीप्रमाणे फसवी घोषणा न करता निधी मिळेल, अशीच घोषणा करावी, अशी मागणी आनंद परांजपे यांनी केली. तसेच, येत्या 19 नोव्हेंबरच्या महासभेत विरोधी पक्षनेते मिलींद पाटील, गटनेते हणमंत जगदाळे आणि ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला या संदर्भात राष्ट्रवादीची भूमिका मांडून नवीन ठाण्याच्या प्रस्तावाला विरोध करतील, असेही परांजपे यांनी सांगितले.

Web Title: New Thane proposal is for the benefit of the builders only. The charges of Jitendra Awhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.