नव्या ठाणे स्थानकाचा चेंडू मंत्रिमंडळापुढे , राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 02:25 AM2017-10-11T02:25:28+5:302017-10-11T02:26:26+5:30
ठाणे आणि मुलुंड रेल्वे स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी मनोरुग्णालयाची जागा मिळावी, या मागणीची दखल घेत ती साडेचौदा एकर जागा देण्यास आरोग्य विभाग सकारात्मक असल्याची माहिती
ठाणे : ठाणे आणि मुलुंड रेल्वे स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी मनोरुग्णालयाची जागा मिळावी, या मागणीची दखल घेत ती साडेचौदा एकर जागा देण्यास आरोग्य विभाग सकारात्मक असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली. मात्र, त्या जागेचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत होईल, असे त्यांनी सांगितले.
सावंत यांच्यासोबत ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खा. राजन विचारे, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा, रेल्वेचे प्रबंधक एस. के. जैन, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी त्यासाठी पाहणी केली. त्यानंतर सावंत यांनी पालिकेने जागेसंबंधी ठेवलेल्या दोन पर्यायांचा विचार करण्यात येईल. तसेच काही पर्याय सुचल्यास ते पालिकेपुढे ठेवण्यात येतील आणि त्यावर येत्या १५ ते २० दिवसांत निर्णय होईल, असा विश्वास व्यक्त केला. नवीन रेल्वे स्थानकासाठी दिवंगत खा. प्रकाश परांजपे यांनी मागणी आणि प्रयत्न केले. मात्र, अनेक अडचणी पार करीत आता जवळ पोचल्याचे शिंदे यांनी सांगितले. या कामात कोणालाही बेघर होऊ देणार नाही. विनासंघर्ष हे काम होईल, असा विश्वास व्यक्त केला.