तुकड्यांपाठोपाठ नवीन विषयांना मंजुरी
By admin | Published: June 30, 2017 02:47 AM2017-06-30T02:47:49+5:302017-06-30T02:47:49+5:30
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे विविध महाविद्यालयांमध्ये नवीन अतिरिक्त तुकड्यांनंतर पदवीच्या अभ्यासक्रमासाठीही
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे विविध महाविद्यालयांमध्ये नवीन अतिरिक्त तुकड्यांनंतर पदवीच्या अभ्यासक्रमासाठीही आता नव्याने काही विषयांना कायम विनाअनुदान तत्त्वावर मंजुरी देण्यात आली आहे. नुकत्याच निघालेल्या परिपत्रकानुसार मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील ३ महाविद्यालयांमध्ये पदवीच्या अभ्यासक्रमासाठीच्या विषयांना मंजुरी मिळाली आहे.
यंदाच्या वर्षी मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या ११ महाविद्यालयांमध्ये पदवीच्या विविध वर्षांसाठी नवीन विषयांना मंजुरी देण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीमधील २, तर भिवंडीतील एका महाविद्यालयात नवीन विषयाला कायम विनाअनुदान तत्त्वावर मंजुरी मिळाली आहे. दी साउथ इंडियन असोसिएशनचे दी एसआयए कॉलेज आॅफ हायर एज्युकेशन येथे टी.वाय.बी.कॉमसाठी एक्स्पोर्ट मार्केटिंग हा विषय मंजूर केला आहे. के.व्ही. पेंढरकर कॉलेजमध्ये एमए (हिस्ट्री) या विषयाला मंजुरी मिळाली आहे. तर, भिवंडीतील दी कोकण मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे जी.एम. मोमीन वुमेन कॉलेज येथे एक्स्टेन्शन अॅक्टिव्हिटीज (डीएलएलई) हा विषय मंजूर झाला आहे. पालघर जिल्ह्यातील बोर्डी येथील एन.बी. मेहता सायन्स कॉलेजमध्ये एम.एस्सी. (फिजिक्स पार्ट-१ बाय पेपर्स) या विषयाला मंजुरी मिळाली आहे.