नव्या वृक्ष प्राधिकरण समितीने दिली तब्बल १ हजार वृक्ष तोडीला परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 05:48 PM2017-10-18T17:48:43+5:302017-10-18T17:52:28+5:30
वृक्ष प्राधिकरणच्या नव्या समितीकडून ठाणेकरांच्या भरपूर अपेक्षा होत्या. परंतु त्या अपेक्षा नव्या समितीने फोल ठरविल्या आहेत. समितीच्या झालेल्या पहिल्याच बैठकीत तब्बल १ हजारून अधिक वृक्ष तोडीच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आल्याने आर्श्चय व्यक्त होत आहे.
ठाणे - मागील वृक्ष प्राधिकरण समितीचा कित्ता नव्या समितीने देखील गिरविला आहे. पहिल्याच बैठकीत नव्या समितीने तब्बल १ हजारहून अधिक वृक्ष तोडीचे प्रस्ताव मंजुर करुन बिल्डरधार्जिनी धोरणाला जणू पुन्हा पाठींबाच दिल्याचे दिसून आले आहे. यामुळे नव्या समितीनेही बांधकाम व्यवसायिकांचे हित डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या प्रस्तावांना मान्यता दिल्याची चर्चा आता शहरात सुरु झाली आहे.
मागील काही महिने वादादीत ठरत असलेली वृक्ष प्राधिकरण समिती अखेर गठीत झाली आहे. या समितीची पहिलीच बैठक मंगळवारी आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीच्या विषय पटलावर महापालिकेच्या विविध प्रकल्पामध्ये बाधीत होत असलेले ४२५ वृक्ष तर बांधकाम व्यावसायिकांच्या विकास प्रस्तावांमध्ये बाधीत होत असलेले एक हजार ९० वृक्ष तोडण्याचे प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. त्यामध्ये २२८ वृक्ष हे सुबाभुळ जातीची आहेत. या सर्व प्रस्तावांना समितीने मान्यता दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसेच बांधकाम व्यावसायिकांच्या विकास प्रस्तावामध्ये वृक्षांचा ठरलेला अडथळाही समितीने दूर केल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे. महापालिकेच्या विविध प्रकल्पामध्ये आणि बांधकाम व्यावसायिकांच्या विकास प्रस्तावामध्ये बाधित होणाºया वृक्ष तोडण्यात येणार असले तरी त्या बदल्यात १६ हजार ३५० वृक्षांची लागवड करण्यात येणार असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे. तसेच पुर्नरोपन करण्यात येणाºया १६६२ वृक्ष तोडीच्या बदल्यात संबंधित विकासांकडून एकूण ८ हजार ३१० वृक्ष लागवड करण्यात येणार असून यामुळे शहरात एकूण २५ हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहेत. असे असले तरी वृक्ष तोडीच्या बदल्यात संबंधित बांधकाम व्यावसायिकांकडून समितीच्या धोरणाप्रमाणे वृक्ष लागवड करण्यात येईल का आणि वृक्ष प्राधिकरण समितीकडून खरोखरच त्यांची पहाणी केली जाईल का, असा सवाल आता शहरातून उपस्थित केला जात आहे.
वृक्ष प्राधिकरण समितीचा कारभार अधिकाधिक लोकाभिमुख आणि सुलभ होण्यासाठी महापालिका आयुक्त व प्राधिकरणाचे अध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी विविध समित्यांची स्थापना केली आहे. यामध्ये न्यायालयीन पातळीवरील होणाºया निर्णयांचा अभ्यास करून त्याआधारे धोरण ठरविण्यासाठी चंद्रहास तावडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली. प्रस्तावांना मंजुरी देण्याच्या अटी आणि शर्थींबाबत अभ्यास करण्यासाठी संतोष तावडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली. तसेच वृक्षवल्ली प्रदर्शनाचे सुयोग्य पद्धतीने आयोजन करण्यासाठी पाच सदस्यांची समिती गठित करण्यात आली. यंदा १३ ते १५ जानेवारीला वृक्षवल्ली प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी मृत वृक्ष निदर्शनास येत आहेत. त्यामुळे या मृत वृक्षांचे संगोपन होऊ शकत नाही. त्यामुळे एक महिन्याच्या आत पालिका क्षेत्रातील सर्व मृत वृक्ष तोडण्याचा व त्या ठिकाणी नव्या वृक्षांचे रोपण करण्याचा निर्णय समितीने एकमताने घेतला.