नववर्षात प्राचीन शिव मंदिरात दर्शनासाठी अलोट गर्दी
By पंकज पाटील | Published: January 1, 2024 07:16 PM2024-01-01T19:16:12+5:302024-01-01T19:16:25+5:30
मंदिर परिसरात महादेवाचा जयघोष करत नवीन वर्ष सुख समृद्धीचे जावे यासाठी भर उन्हात उभे राहून रांगेत शिवभक्तांनी भोलेनाथाचे दर्शन घेऊन नवीन वर्षाची सुरुवात केली.
अंबरनाथ : अंबरनाथमधील प्राचीन शिवमंदिरात सोमवारी नवं वर्षानिमित्त दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. केवळ अंबरनाथ शहरातूनच नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून भाविक या ठिकाणी दर्शनासाठी आल्याने मंदिर परिसरात गर्दी झाली होती. नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने व्हावी यासाठी भाविक मंदिरांमध्ये मोठी गर्दी करतात. त्यामुळे गेल्या काही वर्षात अंबरनाथमधील या प्राचीन शिवमंदिराचा जगभर प्रसार झाल्याने नवीन वर्षाची सुरुवात भोलेनाथाच्या दर्शनाने करण्यासाठी अंबरनाथसह ठाणे जिल्ह्यातील भाविक शेकडोंच्या संख्येने प्राचीन शिवमंदिरात दाखल झाले.
मोठ्या प्रमाणात भाविक शिवमंदिरात भोलेनाथाचं दर्शन घेण्यासाठी आल्याने मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली. सकाळ पासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांग लावल्याने भाविकांच्या दर्शनाची रांग कैलास कॉलनी चौकाच्या पुढे गेली. मंदिर परिसरात महादेवाचा जयघोष करत नवीन वर्ष सुख समृद्धीचे जावे यासाठी भर उन्हात उभे राहून रांगेत शिवभक्तांनी भोलेनाथाचे दर्शन घेऊन नवीन वर्ष्याची सुरुवात केली. तर भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि भाविकांनी रांगेत शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घ्यावं यासाठी मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त देखील तैनात ठेवण्यात आला.
रेल्वे स्थानकातही शिवभक्तांची गर्दी: शेकडोच्या संख्येने शिवभक्त अंबरनाथ मध्ये दर्शनासाठी आल्याने अंबरनाथ रेल्वे स्थानकात देखील भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. विशेष म्हणजे महादेवाच्या दर्शनासाठी आलेल्यांमध्ये तरुण आणि तरुणींची संख्या उल्लेखनीय होती.