नववर्षाची सुरुवात गुन्ह्यांनी न करण्याचे केले आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 12:06 AM2019-12-29T00:06:16+5:302019-12-29T00:06:21+5:30
कल्याण-डोंबिवलीत पोलीस सज्ज; हॉटेल, मॉल, दुकानेही सजली
कल्याण : सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी कल्याण-डोंबिवली सज्ज झाले आहे. पार्ट्यांसाठी विविध हॉटेलमध्ये बुकिंग सुरू झाले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहरांमध्ये चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे अनुचित प्रकार घडून नववर्षात गुन्हे दाखल होऊ नये, यासाठी प्रत्येकाने काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
गर्दीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त नेमण्यात येणार असून बीटमार्शल आणि पीसीआर मोबाइलद्वारे गस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली. परिमंडळ-३ मधील सर्व लॉज, हॉटेल, ढाबे, बार आस्थापनांची तपासणी करण्यात येणार आहे. मद्यप्राशन तसेच अमली पदार्थांचे सेवन करून मोठ्या प्रमाणात अपघात घडतात. या प्रकारांना आवर घालण्यासाठी मोक्याच्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. तसेच ब्रेथ अॅनालायझरमार्फत चालकांची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच, नववर्षाचे स्वागत करताना डीजेद्वारे ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
नववर्षाच्या स्वागतासाठी शहरातील हॉटेल, मॉल तसेच मिठाई, केक आणि गिफ्ट यांची दुकाने सजली आहेत. हॉटेलमध्येही विविध खाद्यपदार्थांवर तसेच थाळीवर सवलती देण्यात आल्या आहेत. हॉटेलवर रोषणाई, सजावट करण्यात येणार असून संगीताचीही तयारी करण्यात आली आहे. यंदाची थर्टी फर्स्ट मंगळवारी आल्याने शाकाहारी खाद्यपदार्थांना विशेष पसंती मिळणार असल्याने काही नावीन्यपूर्ण मेन्यू तयार करण्यात आला आहे.
चौकाचौकांत राहणार नजर
नववर्षाच्या पूर्वसंध्येला शहरातील चौकाचौकांत बंदोबस्त तैनात राहणार आहे. परिमंडळ-३ कल्याणमध्ये एकपोलीस उपायुक्त, दोन सहायक पोलीस आयुक्त यांच्यासह पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक आणि सुमारे ४८० पोलीस कर्मचारी आणि महिला पोलीस यांचा समावेश असणार आहे.