कोरोनाचे नियम पाळून कळव्यात होणार नववर्ष स्वागतयात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:40 AM2021-03-18T04:40:41+5:302021-03-18T04:40:41+5:30
ठाणे : गुढीपाडव्यानिमित्त यंदाही ठाणे शहरात निघणाऱ्या मुख्य नववर्ष स्वागतयात्रेत खंड पडणार असला तरी कळव्यात मात्र कोरोनाचे सर्व नियम ...
ठाणे : गुढीपाडव्यानिमित्त यंदाही ठाणे शहरात निघणाऱ्या मुख्य नववर्ष स्वागतयात्रेत खंड पडणार असला तरी कळव्यात मात्र कोरोनाचे सर्व नियम पाळून ती निघणार आहे. या स्वागतयात्रेचे आयोजक कळवा सांस्कृतिक न्यास तथा गावदेवी-कळवण देवी गुढीपाडवा स्वागत समिती यांची नुकतीच बैठक पार पाडली. यात परंपरेनुसार मोजक्याच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही स्वागतयात्रा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
गुढीपाडव्याला ठाणे शहरात श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या वतीने नववर्ष स्वागतयात्रा काढण्यात येते. त्याअंतर्गत कोपरी, कळवा, वसंतविहार, घोडबंदर रोड, ब्रह्मांड परिसराची उपयात्रा निघत असते. ज्यांना या मुख्य यात्रेत सहभागी होणे शक्य होत नाही ते त्यांच्या भागात उपयात्रा काढतात. गेल्या वर्षी कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे नववर्ष स्वागतयात्रेत खंड पडला होता. यंदाही कोरोनाचे निर्बंध असल्याने श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित ठाणे शहरातील नववर्ष स्वागतयात्रेला जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी नाकारली आहे. ती होणार नसली तरी या यात्रेचे विस्मरण होऊ नये म्हणून छोटेखानी कार्यक्रम करण्याचा न्यासाचा मानस आहे. एकीकडे ठाणे शहरातील मुख्य नववर्ष स्वागतयात्रा होणार नसली तरी कळव्यातील नववर्ष स्वागतयात्रा होणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष गोविंद पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
-----------------------------------------
अशी असेल स्वागतयात्रा
सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास मोजके लोक येतील. यात वारकरी आणि पदाधिकारी यांचा समावेश असेल. आदल्या दिवशी म्हणजेच पाडव्याच्या पूर्वसंध्येला गावातील स्थानिक रहिवासी यांना पाच बाय पाच फुटांची रांगोळी काढण्याचे आवाहन केले असून, पहिले तीन क्रमांक आणि दोन उत्तेजनार्थ पारितोषिके दिली जाणार आहेत. टाळ-मृदुंगाच्या तालात पालखी काढण्यात येणार असून, गावदेवी मंदिर ते गावदेवी मैदान असा पालखीचा मार्ग असेल. त्यानंतर आभार प्रदर्शन करून पसायदानाने स्वागतयात्रेची सांगता केली जाईल.