ठाण्यातील नाल्यात सापडले मगरीचे नवजात पिल्लू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 09:25 AM2021-06-16T09:25:45+5:302021-06-16T09:25:58+5:30
पिल्लू जाळ्यात आले असावे ही शक्यताही नाकारता येत नाही. मार्श या प्रजातीच्या मगरी आपल्याकडे तुलसी तलाव आणि उपवनाच्या तलावात आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : वागळे इस्टेट येथील रामनगर परिसरातील नाल्यात एक दीड ते दोन आठवड्यांचे लहान मगरीचे पिल्लू सापडले आहे. मार्श प्रजातीच्या मगरीचे हे पिल्लू पुनर्वसू फाउंडेशन या वाइल्डलाईफ वेल्फेअर असोसिएशनच्या निगराणीत आहे. अशा प्रकारे दोन वर्षांपूर्वी त्या नाल्याच्या परिसरात मगरीचे पिल्लू मिळून आले होते. या घटनांमुळे ही मगरीची पिल्ले कुठून येतात, याचा शोध घेणे गरजेचे आहे.
एक तर अशा प्रकारे या मगरीच्या पिल्लांना कोणी तरी आणून सोडत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मामा-भाचे डोंगराच्या पायथ्याशी रामनगर वसलेले आहे. त्याच परिसरातून जाणाऱ्या नाल्यात स्थानिकांना मगरीचे पिल्लू सोमवारी (दि. १४) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आले. त्यांनी तातडीने माहिती दिल्यावर पुनर्वसू फाउंडेशन या वाइल्डलाईफ वेल्फेअर असोसिएशनच्या सदस्यांनी धाव घेतली. तेथे गेल्यावर त्या जिवंत पिल्लाला ताब्यात घेऊन त्याची तातडीने वैद्यकीय तपासणी केली. त्यावेळी त्याला कोणतीही दुखापत झाली नसल्याचे स्पष्ट झाले.
मात्र हे पिल्लू नेमके कुठून आले तसेच त्याला कोणी येथे आणून सोडले असावे अशीच शक्यता आहे; कारण त्या नाल्यात मगर येणे खूप कठीण आहे. त्यातच मासे पकडताना ते
पिल्लू जाळ्यात आले असावे ही शक्यताही नाकारता येत नाही. मार्श या प्रजातीच्या मगरी आपल्याकडे तुलसी तलाव आणि उपवनाच्या तलावात आहेत. हे पिल्लू ही त्याच प्रजातीतील आहे. त्या नवजात पाहुण्याची (पिल्लाची) काळजी घेतली जात
आहे. डॉक्टरांच्या मदतीने याच परिसरात मागे सापडलेल्या पिल्लाप्रमाणे या नव्या पिल्लालाही सोडले जाणार असल्याचे असोसिएशनने सांगितले.
‘सापडलेल्या पिल्लाची वैद्यकीय तपासणी केली असून त्याला कोणतीही दुखापत झालेली नाही. ते व्यवस्थित असून त्याला आता सोडणे शक्य नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वनविभागामार्फत सोडण्यात येईल. ते अवघे दीड ते दोन आठवड्यांचे असून त्या एक फुटाच्या पिल्लाचे वजन १०० ग्रॅम आहे.
- आदित्य पाटील, अध्यक्ष, पुनर्वसू फाउंडेशन