कोविड रुग्णांच्या जेवणाकरिता नव्याने मागवल्या निविदा; विरोधक आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 12:59 AM2020-08-27T00:59:09+5:302020-08-27T00:59:36+5:30
२०८ रुपयांत जेवण, नाश्त्याचा प्रस्ताव नाकारला
अंबरनाथ : कोविड रुग्णालयात रुग्णांना जेवण देण्यासाठी ठेकेदार नियुक्त करण्याकरिता यापूर्वी मागवलेल्या निविदा रद्द करुन नव्याने निविदा काढण्यात आल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाकडून कोविड रुग्णांना २९८ रुपयांत जेवण दिले जात असताना २०८ रुपयांत अधिक जिन्नस देण्याची तयारी ठेकेदाराने दाखवली होती. मात्र त्याला काम न देता नव्याने निविदा मागवली आहे.
पालिका सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अगोदर मागवलेली निविदा कमी दराची असतांनाही संबंधित ठेकेदाराला काम न देता नवीन निविदा काढण्यात आली आहे. नव्या निविदेतील अटी व शर्ती पाहता मोजकेच ठेकेदार त्यांची पूर्तता करु शकतील, असे बोलले जात आहे.
अंबरनाथ नगरपरिषदेच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या कोविड रुग्णालयातील रुग्ण आणि क्वारंटाईन सेंटरमधील संशयित यांना जेवण देण्यासाठी ठेकेदार नेमण्याची प्रक्रिया सुरु आहे. दोन महिन्यांपूर्वी जेवणासाठी जी निविदा मागविण्यात आली होती, ती रद्द करण्यात येत आहे. कोविड रुग्णालयात सुरुवातीला २२० रुपयांत दोन वेळचे जेवण आणि सकाळचा नाश्ता देण्याची सोय ठेकेदारामार्फत केली होती. मात्र त्या जेवणाच्या दर्जाबाबत तक्रार येत असल्याने पालिका प्रशासनाने त्या ठेकेदाराचे काम थांबवले. नवीन निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली. जुलै महिन्यातील या निविदा प्रक्रियेनंतर सर्वात कमी दराची निविदा २०८ रुपयांची आली होती. त्या जेवणात फळ आणि दुधाचाही समावेश होता. अगोदरच्या ठेकेदाराला काम थांबवण्यास सांगितल्याने तात्पुरती व्यवस्था म्हणून जिल्हा प्रशासनाने नेमलेला ठेकेदार २९८ रुपयात केवळ नाश्ता आणि जेवण देत होता.
पालिकेला प्रतिसाद देणारा नवीन ठेकेदार २०८ रुपयात दोन वेळचे जेवण, नाश्ता, दोन वेळेस दूध, दोन अंडी आणि जेवणासोबत फळ असे पदार्थ देण्यास तयार होता. मात्र पालिकेने २०८ रुपयात जेवण देण्याची निविदा स्वीकारली नाही. आता पुन्हा नव्याने जेवणाचा ठेकेदार नियुक्त करण्याकरिता निविदा मागवल्या आहेत. मात्र नवीन निविदांमध्ये जेवणारे दर हे रद्द केलेल्या निविदेपेक्षा जास्त आल्यास पालिकेला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागण्याची भीती आहे.
कोरोनाग्रस्त रुग्णांना दर्जेदार जेवण मिळावे, ही सर्वांचीच अपेक्षा आहे. मात्र, चांगल्या जेवणाच्या नावावर अवास्तव खर्च करणे चूक आहे. कमी किमतीत चांगले जेवण देणाºया ठेकेदाराला काम नाकारून मर्जीतील ठेकेदाराला काम देण्याचा अट्टहास असेल, तर मनसे प्रशासनाला जाब विचारेल. - कुणाल भोईर, शहराध्यक्ष, मनसे
कोविड रुग्णालयातील जेवणासंदर्भातील जी २०८ रुपयांची सर्वात कमी दराची निविदा आली होती, ती रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. निविदा प्रक्रियेमध्ये जेवणासह इतर ७३ वस्तूंच्या निविदा एकत्रित मागवल्याने निविदा रद्द केली. नव्याने मागवलेल्या निविदेत जेवणाचे पदार्थ बदलले आहेत. नव्या निविदेचा जुन्या निविदेशी संबंध नाही. जेवणाचा दर्जा चांगला राहावा, याकरिता कठोर अटी व शर्तींचा समावेश केला आहे. - प्रशांत रसाळ, मुख्याधिकारी, अंबरनाथ