आईवडिलांना पाहुणचार न केल्याने नवविवाहितेची ठाण्यात आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 09:12 PM2018-05-07T21:12:27+5:302018-05-07T21:12:27+5:30
अगदी क्षुल्लक कारणावरुन एका नवविवाहितेने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना ठाण्याच्या ज्ञानेश्वरनगरमध्ये रविवारी घडली. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस तपास करीत आहेत.
ठाणे : औरंगाबाद येथून ठाण्यात लेकीकडे आलेल्या सासू सास-यांना जावयाने पाहुणचारासाठी आग्रह न धरल्याच्या रागातून रविना बाबासाहेब राऊत (२२) या नवविवाहितेने आत्महत्या केल्याची घटना ज्ञानेश्वरनगर येथे रविवारी घडली. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्ञानेश्वरनगरातील पंचपरमेश्वर चाळीत रविना आणि बाबासाहेब हे दाम्पत्य वास्तव्याला आहे. अवघ्या वर्षभरापूर्वीच त्यांचा विवाह झाला आहे. त्यांच्यात २ मे रोजी क्षुल्लक कारणावरून आधीच वाद झाला होता. नेमकी त्याचवेळी औरंगाबाद येथून रविनाचे आईवडिल तिला भेटण्यासाठी आले. त्यावेळी जावई त्यांच्याशी फारसे काही बोलले नाही. शिवाय, त्यांना जेवण किंवा राहण्यासाठीही त्यांनी काहीच आग्रह धरला नाही. त्यामुळे ते ३ मे रोजी पुन्हा आपल्या गावी निघून गेले. यातून पुन्हा या दाम्पत्यामध्ये पुन्हा ४ आणि ५ मे रोजी वाद झाला. याच वादातून तिने उंदीर मारण्यासाठी आणलेले विष शनिवारी रात्री प्राशन केले. आपण विष घेतल्याचे तिने पतीला न सांगता रात्री केवळ अस्वस्थ वाटत असल्याचे सांगितले. त्यावर दवाखान्यात जाण्यासही तिने नकार दिला. दुसºया दिवशी ६ मे रोजी पुन्हा त्रास झाल्यानंतर सकाळीच ९ वाजण्याच्या सुमारास ते स्थानिक खासगी रुग्णालयात गेले. त्यावेळी मात्र तिने असे विष घेतल्याचे डॉक्टरांना सागितले. तिला तातडीने नौपाड्यातील ‘निपुण’ या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतांनाच ६ मे रोजी रात्री ८.५० वाजण्याच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. घरात सासू सास-यांना राहण्यासाठी आग्रह न केल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोघांमध्ये वाद झाला होता, अशी माहिती चौकशीत समोर आल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले. हा संपूर्ण प्रकार वागळे इस्टेट पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात घडलेला असल्याने याप्रकरणी सोमवारी (७ मे रोजी ) वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.