CoronaVirus News: लग्नानंतर दोनच दिवसांत नवरदेवाचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 02:11 AM2020-06-14T02:11:23+5:302020-06-14T06:54:30+5:30
नवरदेव कोरोनाबाधित आढळून आल्यामुळे लग्नकार्यासाठी उपस्थित असलेल्यांमध्ये खळबळ
जव्हार : ग्रीन झोनमध्ये असलेल्या जव्हार तालुक्याला कोरोनामुळे गालबोट लागले असून तालुक्यात सध्या १० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, बुधवारी एका व्यक्तीचा विवाह समारंभ पार पडला, मात्र दोनच दिवसांत शुक्रवारी नवरदेव कोरोनाबाधित आढळून आल्यामुळे लग्नकार्यासाठी उपस्थित असलेल्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
कोरोनाबाधित असलेल्या एका शासकीय बसचालकाच्या संपर्कात आलेल्या खाजगी दवाखान्याच्या तीन नर्स आणि एका व्यवस्थापकाला कोरोनाची लागण झाली आहे. या व्यवस्थापकाचे बुधवारी लग्नकार्य उरकून घेण्यात आले होते. मात्र आता हे नवरदेवच कोरोनाबाधित आढळल्यामुळे लग्नकार्यासाठी उपस्थित असलेल्यांमध्ये धाकधूक वाढली आहे. तीन नर्स आणि व्यवस्थापक अशा चौघांच्या संपर्कात असलेले शेकडो रुग्ण व कुटुंबीयांची आरोग्य विभागाकडून शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. तसेच केळघर, पिपुर्णा व डेंगाचीमेट हे तीन ग्रामीण भाग व शहरी भागात नवापाडा, गोरवाडी व जांभुळविहीर या तीन ठिकाणांना प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करून बंदी घालण्यात आली असल्याची माहिती जव्हार तहसीलदार संतोष शिंदे यांनी दिली.
काही दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आढळलेला बसचालक नोकरीवरून आल्यानंतर त्याला त्रास होऊ लागला. तो एका खासगी रुग्णालयात उपाचारासाठी गेला. त्या वेळी तेथील डॉक्टरांनी त्याला सरकारी रुग्णालयात पाठविले. तेथून त्याचे स्वॅब दोन वेळा पाठविण्यात आले, मात्र अहवाल निगेटिव्ह आले. यात पाच ते सहा दिवसांचा अवधी लागला. दरम्यान, तिसरा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे आरोग्य विभागाने त्याच्या संपर्कातील त्या दवाखान्यातील कर्मचाऱ्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले. शुक्रवारी उशिरा यातील तीन नर्स कर्मचारी तर एका व्यवस्थापकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
रुग्णवाढीची भीती
व्यवस्थापकाचे लग्नकार्य अहवाल येण्यापूर्वीच उरकण्यात आले. त्यामुळे दवाखान्यात उपाचारासाठी आलेले रुग्ण तसेच लग्नकार्यासाठी जमलेली मंडळी अशी संपकार्तील मोठी संख्या असल्याने रुग्ण वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.