वृत्तपत्रे, मोलकरणी यांच्यासाठी गृहनिर्माण सोसायट्यांचे दरवाजे बंद; पदाधिकाऱ्यांची हडेलहप्पी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 11:37 PM2020-07-03T23:37:37+5:302020-07-03T23:37:49+5:30
मनमानीमुळे अनेक रहिवासी त्रस्त, भांडणे-वादविवाद
ठाणे : कोरोनाच्या भीतीपोटी ठाणे शहरातील बहुतांश उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये दूध आणि वृत्तपत्रविक्रेत्यांना प्रवेश नाकारला जात आहे. अनेक ठिकाणी घरकाम करणाऱ्यांनाही प्रवेश दिला जात नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची कुचंबणा होत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. काही सोसायट्यांमधील पदाधिकाºयांनी तर दादागिरी केली. त्यांच्या सुरस कहाण्या कानांवर येत आहेत.
मुलगा आपल्या वृद्ध आईवडिलांची चौकशी करायला आला असता त्याला प्रवेश नाकारणे. लहानपण ज्या सोसायटीत गेले, त्या सोसायटीने सासरी गेलेल्या मुलींना आपल्या माहेरी प्रवेश करू दिला नाही. अनेक सोसायट्यांचे पदाधिकारी हे आपापल्या मनमर्जीनुसार नियम करून सदस्यांची छळवणूक करीत असल्याचे दिसले आणि अजूनही दिसत आहे.
वसंतविहारसारख्या उच्चशिक्षित आणि उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये दूधपुरवठा करणाºया व्यक्तींना हटकले जाते. काही ठिकाणी दूध लॉबीमध्ये ठेवण्याच्या सूचना आहेत. काही ठिकाणी सोसायटीत गेल्यानंतर सर्व नोंदी करण्याची प्रक्रिया करूनच प्रवेश दिला जातो. पण, सकाळी घाईगर्दीच्या वेळी नोंदी करीत बसणार की दूधवाटप करणार, असा सवाल विक्रेत्यांनी केला. असाच अनुभव वृत्तपत्रवाटप करणाºया व्यक्तींनाही येतो. माजिवडा येथील काही वृत्तपत्रविक्रेत्यांनी याची थेट पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर, या सोसायट्या नरमल्या.
राज्य शासनाने ७ जूनपासून घरोघरी वृत्तपत्रवाटपाला परवानगी दिली आहे. तरीही, पेपर टाकणाºयांना सोसायट्यांमध्ये प्रवेश का नाकारला जातो, असा सवाल ठाणे शहर वृत्तपत्रविक्रेता असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता घाडगे यांनी केला. घोडबंदर रोड, वसंतविहार, वर्तकनगर आणि माजिवडा या भागात हा त्रास अधिक आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक यांनीही घरोघरी वृत्तपत्रविक्रीला परवानगी दिली आहे. वृत्तपत्रविक्रेत्यांना अडवणे चुकीचे असल्याचेही घाडगे म्हणाले. एखाद्या सोसायटीमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळला म्हणून तिथे दूधपुरवठा करणाºयाला प्रवेश नाकारणे चुकीचे आहे. रुग्णांनाही दुधाची गरज असल्याचे मत दूधविक्रेता संघटनेचे पांडुरंग चोडणेकर यांनी व्यक्त केले.
सोसायट्यांमध्ये बाहेरच्यांना मज्जाव
ठाणे शहरातील घोडबंदर भागातील मोठ्या गृहसंकुलांमध्ये आजही प्रवेश नाकारला जात आहे. घरकाम कामगार, वृत्तपत्रविक्रेते यांना प्रवेशाला मज्जाव करताना दुरुस्तीची कामे करणाºयांना तसेच भाजीविक्रेत्यांना प्रवेश दिला जात आहे. येथील एका सोसायटीने तर प्रवेशद्वारावर फलक लावून घरेलू कामगार, वृत्तपत्रविक्रेते आणि बाहेरच्यांना प्रवेश दिला जाणार नसल्याचे स्पष्ट केले. गाडी धुणाºया कर्मचाºयांनाही अद्याप काही सोसायट्यांनी प्रवेश नाकारला आहे.
कामावर जाणाºयांना बंदी नाही : लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर अनेक उद्योग, कंपन्यांनी आपल्या कर्मचाºयांना कामावर येण्यास सांगितले. लॉकडाऊनच्या काळात काही सोसायट्यांचे पदाधिकारी सदस्यांना बाहेर पडण्यास मज्जाव करीत होते. आरोग्यसेवेतील कर्मचाºयांनाही काही सोसायट्यांनी तुम्ही कोरोना रुग्णांवर उपचार करायला जाता तर मग येऊ नका, अशी अरेरावी केली. अनलॉकनंतर कामावर जाण्यास कुठलीही बंदी नव्हती.
रहिवाशांवर आता कोणतेही बंधन नाही
जिल्ह्यात पहिला लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर कोरोनाला रोखण्यासाठी सोसायटीच्या रहिवाशांच्या सहमतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. पण, आता कोणतीही मनाई नाही. आमच्या सोसायटीमध्ये वृत्तपत्रवितरक, घरेलू कामगार रोज येतात. याशिवाय सेल्समन, एसी, टीव्ही, डीटीएच मेकॅनिक, डिलिव्हरी बॉय यांची अडवणूक होत नाही. - धोंडिबा चांदणे, बदलापूर (पश्चिम)
सामाजिक अंतर राखण्यासाठी प्रयत्न
शहरात रु ग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे आता सोसायटीतील रहिवाशांना आवारात सामाजिक अंतर पाळण्यास सक्ती केली आहे. भाजीविक्रेत्यांना मनाई नाही, पण भाजी खरेदी करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन बंधनकारक केले आहे. पेपर येत असून घरकाम करणाºयांना, सफाई कामगारांना मनाई केलेली नाही. - केशव कापसे, उल्हासनगर
ठाण्यात वृत्तपत्रविक्रेते, घरेलू कामगार यांना सोसायटीचे दरवाजे बंद असताना सेल्समन, एसी, टीव्ही, डीटीएच मेकॅनिक, डिलिव्हरी बॉय यांना परवानगी दिलेली आहे, असे दीपेश दळवी या रहिवाशाने सांगितले. खाद्यपदार्थ आॅनलाइन मागवल्यावर ते गेटजवळ येऊन घेऊन जावे लागते. आपत्कालीन सेवेतील कर्मचारी, बँक कर्मचारी यांना कामावर जाऊ दिले जात आहे. रहिवाशांना बाहेर येजा करण्यास कोणतीही ठरावीक वेळ आमच्या सोसायटीमध्ये नसल्याचे रोहन शास्त्री यांनी सांगितले. काही सोसायट्यांत रहिवाशांनी येजा करताना वॉचमनकडे नोंदी ठेवायला भाग पाडले जात आहे.