पुढील शनिवारी राज ठाकरे ठाणे मुक्कामी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2019 08:17 PM2019-11-02T20:17:32+5:302019-11-02T20:18:03+5:30
विधानसभा निवडणुकीच मतदानारूपी मिळालेल्या आर्शीवादानंतर मनसेने आता आगामी ठाणे महापालिकेची रणनीती तयार करण्याची तयारी सुरू केली आहे.
ठाणे - विधानसभा निवडणुकीच मतदानारूपी मिळालेल्या आर्शीवादानंतर मनसेने आता आगामी ठाणे महापालिकेची रणनीती तयार करण्याची तयारी सुरु केली आहे. त्यानुसार येत्या 9 नोव्हेंबर रोजी मनसेचे प्रमुख राज ठाकरे हे ठाण्यात दाखल होणार असून ते दिवसभर पदाधिकाऱ्यांशी विधानसभानिहाय बैठका घेऊन या संदर्भात चर्चा करणार आहेत. दरम्यान शनिवारी सकाळी ते आपल्या पत्नीच्या ठाण्यातील घरी दिवाळी निमित्त आले होते. यावेळी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी ही भुमिका घेतल्याची माहिती मनसेचे शहर अध्यक्ष रवी मोरे यांनी दिली.
ठाण्यातील पाचपाखाडी भागातील सेंटर पॉईंट येथे राज ठाकरे यांचे जवळचे नातेवाईक राहत असून त्यांच्याकडे ते आले असता यावेळी त्यांनी ठाण्यातील पदाधिकाऱ्यांशी बोलताना ही माहिती दिली आहे. 9 तारखेला होणाऱ्या या बैठकीत ठाणो जिल्ह्यातील 24 विधानसभा मतदार संघाचा मतदारसंघ निहाय आढावा देखील ते घेणार आहेत. राज ठाकरे यांच्या या पुढील भेटीमुळे ठाण्यात यानंतरच्या काळात मनसे अधिक कार्यशील होणार असल्याचे संकेत ठाकरे यांनी दिले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ठाण्यात राज ठाकरे त्यांच्या कुटुंबियांसोबत ठाण्यातील त्यांचे जवळचे नातेवाईकांकडे दिवाळीनिमित्त आले होते.
ठाण्यातील तीन मतदार संघ आणि कल्याण ग्रामीण मतदार संघात मनसेने आपले उमेवार उभे केले होते. यामध्ये कल्याण ग्रामीण मधून राजू पाटील हे राज्यातील मनसेचे एकमेव उमेवार निवडून आले आहेत. तर ठाणे शहर विधानसभा मतदार संघात जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांचा थोडक्यात पराभव झाला आहे. ओवळा - माजिवडा माजिवडा आणि कोपरी पाचपाखाडी मतदार संघातील मनसेच्या उमेदवारांनी देखील या विधानसभेच्या निकालामध्ये चांगली मते पडली असल्याचे समोर आली आहे. त्यामुळे काही का होईना मनसेच्या मतांमध्ये काही प्रमाणात वाढ झाली असल्याने आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाणो जिल्ह्यात देखील लक्ष घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निकालानंतर ठाणे जिल्ह्यतील सर्वच मतदार संघाचा आढावा राज ठाकरे घेणार असल्याची माहिती शहर अध्यक्ष रवी मोरे यांनी दिली आहे. कोणत्या मतदार संघात मनसेला किती मते मिळाली, मनसेची कोणत्या मतदार संघात ताकद आहे याचा आढावा देखील घेतला जाणार आहे.
आगामी पालिकेच्या निवडणुका देखील होणार असल्याने त्या दृष्टीने मनसेच्या पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे स्वत: मार्गदर्शन करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. विधानसभा निवडणुकीच्या वेळी ठाणो शहर मतदार संघात आणि जिल्ह्यातील जिथे जिथे मनसेचे उमेदवार उभे केले होते त्या ठिकाणी राष्ट्रवादीने या उमेदवारांना पाठिंबा दिला होता. आगामी महापालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील राष्ट्रावादीने मनसेशी युती करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे या बैठकीत या मुद्द्यावर देखील चर्चा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दिवाळी निमित्त राज ठाकरे यांनी शनिवारी ठाण्यात त्यांचे साडू उन्मेष चव्हाण यांची भेट घेतली. ठाण्यात पाचपाखाडी येथे सेंटर पॉइंट इमारतीत राज ठाकरे यांचे साडू राहत असून बरेच दिवस भेट न झाल्याने सह परिवार बहिणीची भेट घ्यायला आली होती यावेळेस जुन्या आठवणींना उजाळा मिळाला असल्याचे यावेळी शिर्मला ठाकरे यांनी सांगितले. अमित ठाकरेने लहानपणी केलेली मस्ती याबाबत सांगताना शिर्मला यांना हसू आवरले नाही. साधारण दोन तास ही पारिवारीक भेट सुरु होती.