ठाण्यात नाश्ता न बनवल्याच्या रागातून भाचीने केला मावशीचा खून
By जितेंद्र कालेकर | Published: October 7, 2018 10:02 PM2018-10-07T22:02:53+5:302018-10-07T22:13:26+5:30
माय मरो अन् मावशी उरो... असे म्हटले जाते. परंतू, ठाण्यातील ७५ वर्षीय शोभा कुलकर्णी या मावशीचा तिच्याच स्वप्ना कुलकर्णी या भाच्चीने अगदी क्षुल्लक कारणावरुन खून केल्याची घटना शनिवारी घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : नाश्ता न बनवल्याच्या रागातून ७५ वर्षीय शोभा कुलकर्णीचा खून करणारी तिची भाची स्वप्ना कुलकर्णी (३९) हिला राबोडी पोलिसांनी शनिवारी अटक केली. संतापाच्या भरात डोक्यावर १४ आणि डोळ्याजवळ एक असे चाकूचे १५ वार तिने केले होते. त्यानंतर, पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्नही तिने केला होता. मात्र, मावशीचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात आणल्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
शनिवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास स्वप्नाला कामावर जाण्याची घाई असल्यामुळे तिने मावशीला नाश्ता बनवण्यास सांंगितले. तिने तो न बनवल्यामुळे दोघींमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने स्वप्नाने रागाच्या भरात स्वयंपाकगृहातील चाकूने मावशीवर सपासप १५ वार केले. त्यामुळे मावशी रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडली. काही क्षणांनंतर भानावर आलेल्या स्वप्नाने बाजूच्याच खोलीत झोपलेले वडील सुधीर कुलकर्णी यांना उठवले. त्यापूर्वी फरशी आणि भिंतीवरील रक्त पुसून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न तिने केला. साफसफाई करताना मावशीला लोखंडी पलंग लागला. त्यातच तिची शुद्ध हरपल्याचा कांगावा तिने केला. वडिलांनीही मुलीवर विश्वास ठेवत आपल्या मेहुणीवर उपचारासाठी त्याच इमारतीमधील एका डॉक्टरला बोलावले. मात्र, तिचा मृत्यू झाल्याचे या डॉक्टरांना समजल्यानंतर त्यांनी मृत्यूचे प्रमाणपत्र देण्यास नकार दिला. अखेर, दुपारी १.३० वाजताच्या सुमारास शोभा यांचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात आणल्यानंतर तिच्या डोक्यात मोठ्या प्रमाणात चाकूचे वार झाल्याची बाब वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली. रुग्णालयातून मिळालेल्या माहितीच्या आधारे राबोडी पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला. घरातील घटनास्थळाच्या पंचनाम्यामध्येही फरशी आणि भिंतीवरील रक्त पुसण्याचा प्रयत्न झाल्याचे उघड झाल्याने पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचे स्पष्ट झाले. चौकशीअंती स्वप्नाला अटक केल्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर हुंबे यांनी सांगितले.
कोलबाडमधील ‘विनायक भवन’ या इमारतीच्या तळ मजल्यावर सुधीर (६५) आणि त्यांची पत्नी चित्रलेखा कुलकर्णी (६०) वास्तव्याला आहेत. त्याच मजल्यावरील दुसºया सदनिकेमध्ये चित्रलेखा यांची अविवाहित बहीण शोभा आणि घटस्फोटित मुलगी स्वप्ना या दोघी वास्तव्याला होत्या. १९८६ मध्ये शिक्षिकेच्या नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी कोलबाडमधील हे राहते घर खरेदी केले होते. शोभा यांची वयोमानाने दृष्टी कमी झाली होती. तरीही, त्या घरातील कामे करत होत्या. स्वप्नाची आई चित्रलेखा या मोठ्या मुलीच्या बाळंतपणासाठी अमेरिकेत अलीकडेच गेल्या आहेत. त्यामुळेच घरातील बरीचशी जबाबदारी या मावशीवरच होती. अगदी क्षुल्लक कारणातून झालेल्या वादातून शीघ्रकोपी भाचीने खून केल्याचे आढळल्यानंतर पोलीसही चक्रावले. वरकरणी खुनाचे कारण क्षुल्लक असल्याचे सांगण्यात आले असले, तरी मालमत्तेच्या वादातूनही हा खून झाल्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तवली आहे.
.............................