नायजेरियन नागरिकांचा पुन्हा त्रास
By admin | Published: October 10, 2016 03:16 AM2016-10-10T03:16:05+5:302016-10-10T03:16:05+5:30
चार वर्षांपूर्वी मीरा-भार्इंदरसह वसई-विरारमध्ये बेकायदा वास्तव्य करणाऱ्या नायजेरियन नागरिकांना पोलिसांनी हुसकावून लावले होते.
भार्इंदर/मीरा रोड : चार वर्षांपूर्वी मीरा-भार्इंदरसह वसई-विरारमध्ये बेकायदा वास्तव्य करणाऱ्या नायजेरियन नागरिकांना पोलिसांनी हुसकावून लावले होते. मात्र, आता पुन्हा मीरा रोडच्या नागरिकांना त्यांचा त्रास होऊ लागला आहे. याविरोधात हाटकेश शिवसेना शाखाप्रमुख महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली परिसरात निदर्शने करण्यात आली.
मीरा-भार्इंदरसह वसई-विरार परिसरात चार वर्षांपूर्वी मोठ्या संख्येने नायजेरियन नागरिक बेकायदा वास्तव्य करीत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे वारंवार येत होत्या. परंतु, त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने त्यांचा उच्छाद वाढू लागला होता. त्यातच, त्यांचे उद्योगही बेकायदा असल्याने स्थानिकांना त्याचा त्रास होऊ लागला होता. अनेक नायजेरियन तात्पुरता व्हिसा मिळवतात. मुदत संपल्यानंतरही वास्तव्य करून मादक द्रव्यांची तस्करी करीत असल्याचे अनेकदा उघड झाले. तत्कालीन ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अनिल कुंभारे यांनी धडक कारवाई केली. त्यांनी बहुतांश नागरिकांना शोधून ताब्यात घेतले होते. कायदेशीर बाबी पूर्ण करून त्यांना पुन्हा त्यांच्या देशात परत पाठवले होते. आता पुन्हा नायजेरियन नागरिकांच्या बेकायदा वास्तव्याला सुरुवात झाल्याने मीरा रोडच्या हाटकेशमधील रहिवासी त्रस्त झाले आहेत. त्यातच, काही घरांत बेकायदा पार्ट्या रात्रभर सुरू असतात.
येथील मंगलनगर परिसरातील रुईया, पांडव, युधिष्ठिर, भीम यासह आसपासच्या काही इमारतींत मोठ्या संख्येने नायजेरियन नागरिक भाडेतत्त्वावर बेकायदा वास्तव्य करीत आहेत. त्यातच भाड्याने घर देताना आवश्यक असलेला पोलिसांचा नाहरकत दाखलाही इमारतीच्या सोसायटी कार्यालयात जमा केला जात नाही. गुपचूप घर भाड्याने देत घरमालक पसार होत असल्याने त्यांना घराबाहेर काढण्यास स्थानिकांना अडचणीचे ठरत आहे. याविरोधात स्थानिकांनी काशिमीरा पोलिसांत तक्रारी केल्यानंतरही त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी शिवसेनेचे शाखाप्रमुख शिंदे यांच्या नेतृत्वाखाली परिसरात रविवारी निदर्शने केली.
निदर्शनात विभागप्रमुख विलास सूर्यवंशी, उपशाखाप्रमुख राजेंद्र पडवळ, शंकर यादव, मंगेश मोरे, महिला विभाग संघटक सोनाली वाघमारे, सुनंदा देसाई आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)