प्रवाशांच्या मागणीअभावी रातराणीला सुरुवातच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:27 AM2021-07-15T04:27:44+5:302021-07-15T04:27:44+5:30

स्टार ९०७ अनिकेत घमंडी लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : कोरोनाची दुसरी लाट आता ओसरू लागल्याने लांब पल्ल्यांच्या एसटी बस ...

The night does not start due to lack of passenger demand | प्रवाशांच्या मागणीअभावी रातराणीला सुरुवातच नाही

प्रवाशांच्या मागणीअभावी रातराणीला सुरुवातच नाही

Next

स्टार ९०७

अनिकेत घमंडी

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : कोरोनाची दुसरी लाट आता ओसरू लागल्याने लांब पल्ल्यांच्या एसटी बस आणि ट्रॅव्हल्स मोठ्या संख्येने सुरू झाल्या आहेत. एसटीची रातराणी बससेवा तुलनेने परवडणारी असल्याने प्रवासी त्याला जास्त प्राधान्य देतात. मात्र, सध्या कल्याण डेपोतून प्रवाशांची मागणी नसल्याने रातराणी बससेवा बंद आहे. त्यामुळे प्रवाशांना रात्रीचा प्रवास करण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्स बसवर अवलंबून राहावे लागत आहे.

कल्याण एसटी बस डेपोतून राज्यातील अहमदनगर, पुणे, कोकण तसेच जळगाव, नाशिक, मालेगाव आदी मार्गांवर बस सुटतात. कोरोना सुरू होण्याआधी या डेपोतून कोल्हापूरपर्यंत रातराणी सुटत होती. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी खबरदारी म्हणून अनेक प्रवासी लांब पल्ल्यांचा प्रवास टाळत आहेत. त्यामुळे मागणीच नसल्याने अद्याप बस सोडण्यात येत नसल्याचे एसटी डेपोतील सूत्रांनी सांगितले. तर, दुसरीकडे एसटीची रातराणी बस उपलब्ध नसल्याने नागरिक खासगी ट्रॅव्हल्सने प्रवास करत आहेत. मात्र, त्या बसही पूर्ण प्रमाणात सुरू झालेल्या नाहीत, पण जशी मुभा मिळेल तसे प्रवासी शहरांतून अन्यत्र जात आहेत. सध्या राज्यांतर्गत जायला फारसे नियम नसल्याने एसटी मिळाली तरी ठीक अन्यथा खासगी वाहनाने प्रवास करण्याकडे प्रवाशांचा कल आहे.

----------

शिवनेरी बसला मागणी

कल्याण डेपोतून पुणे, नाशिक मार्गावर सकाळच्या वेळी शिवनेरी बस चालवल्या जातात. त्यातच चार तासात अपेक्षित ठिकाणी जाता येते, वातानुकूलित बसमधून प्रवास होतो. त्यामुळे शिवनेरी बसच्या प्रवासाला जास्त मागणी आहे.

--------------

एसटी पेक्षा तिकीट जास्त

सध्या एसटीपेक्षा जास्त तिकीट शिवनेरीच्या बसला असते. पुण्यासाठी साधारण १०० रुपये लालपरी पेक्षा जास्त लागतात. ट्रॅव्हल्स मात्र अव्वाच्या सव्वा भाडे आकारतात. पण हव्या त्या वेळांना विशेषत: रात्रीच्या वेळी बस उपलब्ध असल्याने या बसने प्रवास करण्याची प्रवाशांची तयारी असते. लांबच्या प्रवासाला एसटीच्या दुप्पट तिकीट खासगी प्रवासाला आकारले जाते. प्रवासाच्या अंतरावर ते अवलंबून असले तरी तिकीट भाड्यात तफावत आढळून येते.

------------

स्वच्छ व आरामदायी प्रवास

स्वच्छ आणि आरामदायी प्रवास म्हणून अनेकदा प्रवासी एसटीच्या शिवनेरी तसेच खासगी ट्रॅव्हल्सच्या बसला प्राधान्य देतात. लालपरी तुलनेने स्वच्छ नसते, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. शहरी भागातील नागरिक स्वच्छतेला प्राधान्य देत असून, तिकिटांचे पैसे जास्त गेले तरी ते मोजण्याची त्यांची तयारी असते.

--------

गौरी-गणपतीला धावणार रातराणी

सध्या कल्याण बस डेपोतून दिवसाला लांब पल्ल्याच्या ६० बस विविध मार्गांवर सोडल्या जातात. कोरोनापूर्वी ७५ बस सोडल्या जात होत्या. विठ्ठलवाडी आगारातून सध्या दिवसाला ४५ बस सोडल्या जात असून, तेथूनही सध्या रातराणी बस सुटत नाहीत. गौरी-गणपतीच्या काळात या बस सुरू होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.

------

प्रतिक्रिया :

गौरी-गणपतीसाठी एसटी सज्ज झाली आहे. मागील दोन वर्षांपासून कोरोनाचे सावट असल्याने कोकणवासीयांना या सावटाखाली गौरी गणपती उत्सव साजरा करावा लागला होता. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर आता एसटी महामंडळही कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी सज्ज झाले आहे. कल्याण आगारातून कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी ग्रुप बुकिंग, तसेच ऑनलाइन, आगाऊ आरक्षणासाठी एसटी बस ५ सप्टेंबर ते १० सप्टेंबरपर्यंत उपलब्ध करण्यात आल्या आहेत. कोकणवासीयांनी महामंडळाच्या या सेवांचा लाभ घ्यावा.

- विजय गायकवाड, आगार व्यवस्थापक, कल्याण आगार

------

Web Title: The night does not start due to lack of passenger demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.