अंबरनाथमध्ये शाळेच्या मैदानात रंगते रात्रीची दारू पार्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 02:25 AM2019-12-10T02:25:27+5:302019-12-10T02:25:58+5:30
वांद्रापाडा भागात हरिजन सेवा संघाची शाळा भरवण्यात येते. शहरातील जुन्या शाळांपैकी ही एक शाळा आहे.
अंबरनाथ : येथील वांद्रापाडा भागातील हरिजन सेवासंघाच्या शाळेच्या पटांगणात याच भागातील काही मद्यपी नियमित दारू पार्टी करतात. शाळा प्रशासनाला या त्रासाचा नेहमी सामना करावा लागत असून, येथील दारूच्या बाटल्या उचलण्याची वेळ विद्यार्थी आणि शिक्षकांवर दररोज येत आहे.
वांद्रापाडा भागात हरिजन सेवा संघाची शाळा भरवण्यात येते. शहरातील जुन्या शाळांपैकी ही एक शाळा आहे. या शाळेत परिसरातील गरीब आणि गरजू विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या भागात शाळा प्रशासनाला त्रास सहन करावा लागत आहे. शाळेच्या परिसरात बैठ्या घरांची वस्ती असून, याच भागातील मद्यपी रात्री शाळेचा ताबा दारू पिण्यासाठी घेत आहेत. शाळेच्या परिसरात तयार केलेल्या ओट्यावर बसून पार्टी केली जाते.
पार्टीनंतर दारूच्या बाटल्या आणि खाद्यपदार्थ तिथेच फेकून दिले जातात. हा प्रकार नियमित होतो. काही वेळा पालिकेचे सफाई कर्मचारी या बाटल्या उचलतात. मात्र, बऱ्याचदा विद्यार्थी आणि शिक्षकांनाच शाळेचा परिसर स्वच्छ करावा लागतो. याप्रकरणी पोलीस प्रशासनाने रात्रीच्या वेळी शाळा परिसरात गस्त वाढविण्याची मागणी शाळा प्रशासनाने केली आहे. या भागातील टवाळखोर तरुण दिवसरात्र या भागात गोंधळ घालत असतात. त्यांचादेखील विद्यार्थ्यांना त्रास होतो. त्यावरही नियंत्रण आणण्याची मागणी केली जात आहे.