सैनिक होण्याचे निखिलचे स्वप्न अधुरेच
By admin | Published: December 8, 2015 12:49 AM2015-12-08T00:49:48+5:302015-12-08T00:49:48+5:30
‘‘निखिल अभ्यासात खूप हुशार होता. त्याला पदवीनंतर सैन्यात भरती व्हायचे होते. देशसेवा करायची होती. भारतमातेअगोदर तो जन्मदात्या आईला वाचवायला गेला
मुरलीधर भवार, डोंबिवली
‘‘निखिल अभ्यासात खूप हुशार होता. त्याला पदवीनंतर सैन्यात भरती व्हायचे होते. देशसेवा करायची होती. भारतमातेअगोदर तो जन्मदात्या आईला वाचवायला गेला, पण आईही वाचली नाही आणि हाताशी आलेला मुलगाही गेला. माझ्या जगण्याचा आधार गेला. आता मी आणि माझी मुलगीच कुटुंबात उरलो आहोत... सांगा कुणासाठी जगायचं?... भोपर येथे खदाण दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मायलेकाच्या कुटुंबाचे प्रमुख हितेंद्र अंजारा यांचा हा आर्त सवाल काळीज गलबलून टाकत होता. त्यांच्या सांत्वनासाठी आलेले मित्र-नातलगही या कोलमडून पडलेल्या कुटुंबाला धीर देताना हळहळत होते.
भोपर-देसलेपाड्याच्या खदाण दुर्घटनेनंतर निखिलच्या घरी लोकमतचे प्रतिनिधी गेले, तेव्हा हितेंद्र अंजारा निखिलच्या कॉलेजची बॅग पाहत हताश बसून होते. त्याचे काही फोटो शोधत होते. निखिल हा आर.टी. बोस कॉलेजमध्ये वाणिज्य शाखेच्या दुसऱ्या वर्षाला होता. त्याच्यासह त्याच्या आईच्या मृत्यूची माहिती मिळताच कॉलेजमध्ये शिक्षण घेणारे त्याचे मित्र-शिक्षकांनी दुपारी निखिलच्या घरी धाव घेतली. त्याच्या वडिलांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्याचे वडील हितेंद्र अशोका शॉपिंग सेंटरमध्ये कामाला आहेत, तर आई प्रमिला मुंबईत नेव्हीच्या रुग्णालयात कामाला होत्या. या चौकोनी अंजारा परिवारावर रविवारी काळाने झडप घातली.
हितेंद्र हे मूळचे गुजरातचे असले तरी त्यांचा जन्म मुंबईचा. गेली अनेक वर्षे ते भायखळा येथे राहत होते. दोन वर्षांपूर्वी भोपर देसलेपाडा येथील श्री समर्थकृपा चाळीत त्यांनी साडेसहा लाख देऊन घर घेतले. कामावर जाण्यापूर्वी सवयीने प्रमिला सर्व कामे उरकून जात. शनिवारी पाणी न आल्याने कधी नव्हे ते त्या खदाणीवर गेल्या आणि त्यांना सोबत म्हणून गेलेला निखिल आणि त्यांचा बुडून मृत्यू झाला. - संबधित वृत्त/४