निळजे रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीस खुला; अवघ्या १५ दिवसांत केली दुरुस्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 11:59 AM2020-07-11T11:59:30+5:302020-07-11T11:59:50+5:30
१५ जूनपासून हा रस्ता बंद केल्यामुळे इथे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. पण एमएसआरडीसीने नियोजनबद्ध पद्धतीने दुरुस्ती काम करून फक्त १५ दिवसांत पूल पुन्हा सुरू केला.
मुंबईः कल्याण -शीळ रस्त्यावरील निळजे रेल्वे उड्डाणपूल शनिवारी सकाळी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी असुरक्षित असल्याचा अहवाल आयआयटी मुंबईने दिल्यानंतर १५ जूनपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. कल्याण, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ, मुंबई, नवी मुंबई, ठाणे या शहरांना जोडणारा कल्याण-शीळ रस्ता आणि त्यावरचा निळजे रेल्वे उड्डाणपूल इथल्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो. पण १५ जूनपासून हा रस्ता बंद केल्यामुळे इथे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. पण एमएसआरडीसीने नियोजनबद्ध पद्धतीने दुरुस्ती काम करून फक्त १५ दिवसांत पूल पुन्हा सुरू केला.
उड्डाणपूल कमकुवत असला, तरी किमान हलक्या वाहनांसाठी तरी त्याचा उपयोग करता येईल का? याचा विचार सुरू झाला. खासदार श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पुलाची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले. अखेर एमएसआरडीसीने रेल्वे अभियंत्यांशी चर्चा करून दुरुस्तीची योजना तीन टप्प्यात आखली.
तीन टप्प्यात दुरुस्ती
१. पुलावरचा अतिरिक्त भार कमी करणे
२. काँक्रिट स्लॅब मजबूत करणे
३. कमकुवत झालेल्या स्टील गर्डरचं मजबुतीकरण करणे
- टप्पे निश्चित झाल्यानंतर एमएसआरडीसी आणि रेल्वे अभियंते कामाला लागले.
- सर्वात आधी पुलावरचा अतिरिक्त ८० मिमी डांबराचा थर काढला. १० मेट्रिक टन भार हलका झाला
- इपॉस्की ग्राऊटिंग तंत्रज्ञानाचा वापर करून पुलाच्या काँक्रिट स्लॅबचं मजबुतीकरण केलं
- पुलाच्या पृष्ठभागावर फक्त ३० मिमी मास्टीक थर दिला
पुलाच्या ४ पैकी २ गर्डरमध्ये गंज बसलेल्या ठिकाणी किती प्रमाणात हानी झाली आहे हे तपासण्यात आले व त्या लांबीमध्ये बोल्टिंग करून स्टील प्लेट बसवण्यात आल्या. यापुढेही गर्डर गंजू नयेत. म्हणून अँटि कोरोशन पेंट देखील देण्यात आला. पण चाचणीशिवाय पूल वाहतुकीसाठी खुला करणं शक्यच नव्हतं. दुरुस्ती नीट झाली की नाही, हे तपासण्यासाठी प्रत्यक्ष लोडटेस्ट देखील घेण्यात आली. काम पूर्ण झालं. कल्याण-डोंबिवलीमधला सक्तीचा लॉकडाऊन आणि वरून धो धो कोसळणारा पाऊस, या अडचणी असून देखील एमएसआरडीसी आणि रेल्वे विभागाच्या अभियंत्यांनी फक्त १५ दिवसांत पुलाची दुरुस्ती करून हलक्या वाहनांसाठी तो खुला देखील केला.