दोन महिन्यांत निलोफर यांनी गमावले सर्वस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 11:52 PM2020-09-24T23:52:04+5:302020-09-24T23:52:13+5:30
इमारत दुर्घटनेत गमावली लहान बहीण : काही दिवसांपूर्वीच वारले होते वडील, मोठी बहीण
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : जिलानी इमारत दुर्घटनेत अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. निलोफर शेख ही त्यापैकीच एक. दोन महिन्यांपासून नियतीने त्यांच्यावर एकापाठोपाठ एक आघात केले. दोन महिन्यांपूर्वीच वडील आणि मोठी बहीण गमावल्यानंतर, निलोफर यांच्यावर लहान बहिणीच्या मृत्यूचे दु:ख सोसण्याची वेळ आली आहे.
जिलानी इमारत दुर्घटनेमध्ये अनेक कुटुंबांनी बरेच काही गमावले आहे. या इमारतीच्या मलब्यात कुणी आप्तेष्टांच्या काही वस्तू आठवणीसाठी मिळतात का, याचा शोध घेत आहेत; तर कुणी मौल्यवान दागिने, पैसे आणि महत्त्वाची कागदपत्रे मिळतात का, याचा शोध घेत आहेत. निलोफर शेख यादेखील जिवलगांच्या आठवणी शोधण्यासाठी चौथ्या दिवशीदेखील ढिगाऱ्याजवळ दिसल्या. त्यांची धाकटी बहीण शबनम अन्सारी ही या दुर्घटनेत मरण पावली आहे. त्यामुळे कमालीच्या दु:खात असलेल्या निलोफर यांनी त्यांच्या आयुष्यात लागोपाठ आलेल्या संकटांचा पाढाच वाचला. निलोफर यांची मोठी बहीण दोन महिन्यांपूर्वी मरण पावली होती. त्या दु:खातून सावरत नाही तोच, २२ दिवसांनी वडिलांचा मृत्यू झाला. आता इमारत दुर्घटनेत धाकटी बहीण शबनम मृत्युमुखी पडली आहे. सुदैवाने आई वाचली; पण आई आता कुणाच्या भरवशावर राहणार, अशी चिंता तिला सतावत आहे.
शबनम ही अरेबिक क्लास घेऊन आईचा व तिचा उदरनिर्वाह करत होती. आता शबनम गेल्यामुळे कुटुंबाचा आधारच गेल्याची व्यथा निलोफर यांनी मांडली. आपल्या बहिणीची आठवण म्हणून काही मिळते का, याचा शोध घेण्यासाठी निलोफर चार दिवसांपासून दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या आजूबाजूलाच घुटमळत आहेत. तुटक्या आणि मोडक्या सामानाव्यतिरिक्त ढिगाºयाजवळ काहीच दिसत नसल्याने बहिणीची शेवटची आठवणदेखील आपल्याजवळ राहिली नसल्याचे दु:ख मांडताना निलोफर यांना अश्रू आवरले नाही.