तुरुंग अधिकाऱ्यांकडून साक्षी निमसेचा घातपात; मुलीचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 11:05 PM2019-01-30T23:05:40+5:302019-01-30T23:06:01+5:30

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा; नवऱ्याचा खूनाचा होता आरोप

Nimse killed by prison officials; Girl's suspicion | तुरुंग अधिकाऱ्यांकडून साक्षी निमसेचा घातपात; मुलीचा संशय

तुरुंग अधिकाऱ्यांकडून साक्षी निमसेचा घातपात; मुलीचा संशय

Next

कल्याण : आधारवाडी कारागृहात पतीच्या हत्येप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या साक्षी निमसे हिने आत्महत्या केली नसून, तिचा तुरुंगातील अधिकाºयांकडून घातपात झाल्याचा संशय तिच्या १८ वर्षांच्या मुलीने व्यक्त केला आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी करत दोषी अधिकाºयांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, असा अर्ज तिने खडकपाडा पोलिसांना दिला आहे.

शिवसेनेचे शहापूर उपतालुकाप्रमुख शैलेश निमसे (रा. अघई) यांची एप्रिल २०१८ मध्ये हत्या झाली होती. संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी आसनगाव येथील प्रमोद लुटे आणि शैलेश यांची पत्नी साक्षी या दोघांना अटक केली. साक्षीला न्यायालयीन कोठडी मिळाल्याने ११ महिन्यांपासून ती कल्याणच्या आधारवाडी कारागृहात होती. मात्र, रविवारी कारागृहातच तिने आत्महत्या केली. याबाबत साक्षीच्या मुलीने पोलिसांना दिलेल्या अर्जात म्हटले आहे की, आईच्या जामिनासाठी आम्ही सर्व प्रयत्न करत होतो. जेव्हा आमची आईशी भेट होई तेव्हा ती जामिनाबाबत विचारात असे. मात्र, तिच्या बोलण्यातून ती कधी आत्महत्या करेल, असे जाणवले नाही.

मुलीने पुढे म्हटले आहे की, ‘रविवारी दुपारी १ च्या सुमारास आईने आत्महत्या केल्याची माहिती तुरुंग प्रशासनाने आम्हाला कळवली. आम्ही सर्व जण आधारवाडी कारागृहात पोहोचलो. मात्र, तेथील अधिकाºयांनी आईचा मृतदेह उल्हासनगर येथील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविल्याचे सांगितले. परंतु, नातेवाईक नसताना तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कसा पाठवला, अशी विचारणा आम्ही केली. त्यावर अधिकाºयाने सांगितले की, साक्षी जिवंत असल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात पाठवले होते. कारागृहात आईने आत्महत्या केली ते ठिकाण नातेवाइकांनी दाखविण्यास सांगितले असता ती जागाही संबंधित अधिकाºयाने दाखवली नाही. तसेच, साक्षीने गळफास घेतला, असे कोणतीही महिला सांगू इच्छित नव्हती. ज्या दोन महिला आल्या होत्या त्याही पढवल्यासारख्या बोलत होत्या. हा सर्व प्रकारच संशयास्पद वाटत असल्याने माझ्या आईने आत्महत्या केलेली नाही.’

मानवी हक्क आयोगाकडेही दाद
तुरुंगातील अधिकाºयांकडूनच साक्षीचा घातपात झाला असावा, असा दाट संशय आहे. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून मला न्याय द्यावा, अशी मागणी करणाºया अर्जाची प्रत साक्षीच्या मुलीने राज्य मानवी हक्क आयोग, ठाणे पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण आणि महिला तक्रार निवारण कक्षालाही दिली आहे.

जामीन मिळत नसल्याने त्रास होत आहे. त्यामुळे मला जगावसे वाटत नाही, असे साक्षी तुरुंगातील महिला कैद्यांजवळ बोलली होती. कारागृहात असे काही घडत नाही. आमच्यावर करण्यात आलेला आरोप हा खोटा आहे.
- भारत भोसले, तुरुंगाधिकारी, आधारवाडी कारागृह

Web Title: Nimse killed by prison officials; Girl's suspicion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.