नऊ सहायक आयुक्त हप्तेखोर; ठामपा महासभेत सत्ताधारी नगरसेवकाचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 11:22 PM2019-06-19T23:22:22+5:302019-06-19T23:22:42+5:30

कारवाईत ढिलेपणाची प्रशासनाचीही कबुली

The nine assistant commissioner is a professor; The allegations of a ruling councilor in Thampa General Assembly | नऊ सहायक आयुक्त हप्तेखोर; ठामपा महासभेत सत्ताधारी नगरसेवकाचा आरोप

नऊ सहायक आयुक्त हप्तेखोर; ठामपा महासभेत सत्ताधारी नगरसेवकाचा आरोप

Next

ठाणे : मुंब्य्रासारख्या भागात फेरीवाल्यांवर कारवाई होऊ शकते. परंतु, ठाण्यात ती का होत नाही, असा सवाल करून सर्वपक्षीय नगरसेवकांनी बुधवारच्या महासभेत प्रशासनावर हल्लाबोल केला. यावेळी ठाणे महापालिकेचे नऊ सहायक आयुक्त हे फेरीवाल्यांकडून हप्ता घेत असल्याचा धक्कादायक आरोपच यावेळी सत्ताधारी पक्षातील ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर यांनी केला. त्यांच्या घरीच हप्ते जात असल्याने फेरीवाल्यांवर कारवाई होत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे प्रशासनानेसुद्धा फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात कमी पडत असल्याचे सांगून अप्रत्यक्षपणे भोईर यांच्या आरोपाला खतपाणी घातले.

मे महिन्यात नौपाड्यातील आंबाविक्रेत्यावर महापालिकेने कारवाई केली होती. त्यानंतर, याच मुद्यावरून भाजपविरुद्ध मनसे यांच्यात राडाही झाला होता. मनसेने या शेतकऱ्यांच्या बाजूने मोर्चाही काढला होता. त्यानंतर, हे प्रकरण शांत झाले, असे वाटत असतानाच, बुधवारच्या महासभेत हाच धागा पकडून भाजपच्या नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी मुंब्य्रासारख्या भागात फेरीवाल्यांवर कारवाई होऊ शकते, तर ठाण्यात का नाही? असा सवालही केला.

शहरातील गोखले रोड, नौपाडा, स्टेशन रोड आदी भागांत फेरीवाल्यांची संख्या वाढत आहे. त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी नगरसेवक करतात, तेव्हा त्यांच्यावरच पैसे घेतल्याचे आरोप केले जातात, असा पलटवार त्यांनी यानिमित्ताने मनसेवर केला.
यावेळी सर्वपक्षीय नगरसेवकांनीही शहरात वाढत असलेल्या फेरीवाल्यांना टार्गेट केले. ग्लॅडी अल्वारीस रोडवर सायंकाळनंतर फेरीवाल्यांचे प्रस्थ वाढलेले असते. वर्तकनगर भागातही फेरीवाल्यांची संख्या वाढत आहे. या फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी करून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप परिषा सरनाईक यांनी केला. तर, फेरीवाल्यांवर कारवाई व्हावी, म्हणून नागरिकांना या शहरात मूक मोर्चा काढावा लागतो, यापेक्षा आणखी काय दुर्दैव असेल, अशी टीका मुकेश मोकाशी यांनी केली. हाजुरी, तीनहातनाका आदींसह इतर परिसरांतही त्यांची संख्या वाढत असून त्याठिकाणी मोठे कंटेनरही पार्क होत आहेत. परंतु, त्यावरही कारवाई होत असल्याचा आरोप मीनल संख्ये यांनी केला.

हप्तेखोरीचे फोटोही उपलब्ध
फेरीवाल्यांच्या वाढत्या प्रस्थावर चर्चा होत असतानाच सत्ताधारी पक्षातील ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर यांनी ठाणे महापालिकेचे नऊ सहायक आयुक्त हे हप्तेखोर असून त्यांना त्यांच्या घरी हप्ते जातात, असा गंभीर आरोप केला. त्याचे फोटोही आपल्याकडे आहेत. हप्तेखोरीमुळेच फेरीवाल्यांवर कारवाई होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी केलेल्या या आरोपाने सभागृह चांगलेच आवाक झाले. प्रशासनाने याबाबत गंभीर दखल घ्यावी, सहायक आयुक्तांना महासभेत हजर करावे, अशी मागणीही यावेळी सर्वपक्षीय सदस्यांनी केली.

फेरीवाल्यांचे फेरसर्वेक्षण पूर्ण : फेरीवाल्यांचे फेरसर्वेक्षण पूर्ण झाले असून त्यानुसार शहरात सुमारे १२ हजार फेरीवाले आहेत, अशी माहिती बुरपुल्ले यांनी दिली. फेरीवाल्यांसाठी १४८ झोन अंतिम करण्यात आले आहेत. त्यांचे रजिस्ट्रेशन, बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. परंतु, त्यांच्या जागा अंतिम करण्यासंदर्भातील प्रकरण फेरीवाला शहर कमिटीपुढे ठेवण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आजपासून फेरीवाल्यांवर कारवाई करा - महापौर
महासभेत फेरीवाल्यांच्या मुद्यावरून गदारोळ झाल्यानंतर आजपासूनच फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात यावी, असे आदेश महापौर मीनाक्षी शिंदे यांनी दिले. परंतु, त्यांचे साहित्य जप्त केल्यानंतर ते सोडवण्यासाठी पुन्हा नगरसेवकांनी प्रशासनावर दबाव आणू नये, अशी सूचनाही त्यांनी केली. शिवाय, फेरीवाला कमिटीमध्ये नगरसेवकांचाही समावेश करण्यासंदर्भात ठराव करण्यात यावा, असेही सुचवले.

फेरीवाले वाढल्याची प्रशासनाची कबुली
दुसरीकडे शहरात फेरीवाल्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत असल्याची कबुली अतिक्रमण विभागाचे उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांनी दिली. एवढेच नव्हे तर त्यांच्यावर कारवाई करण्यात कमी पडत असल्याचेही त्यांनी मान्य केले. परंतु, सहायक आयुक्तांना केवळ फेरीवाल्यांवर कारवाई करणे एवढेच काम नसून बिले तयार करणे, मालमत्ताकराची वसुली करणे, अनधिकृत बांधकामांवर लक्ष देणे आदींसह इतरही कामे करावी लागत असल्याचे सांगून त्यांनी जणू सहायक आयुक्तांची पाठराखणच केल्याचे दिसून आले. तसेच फेरीवाल्यांवर कारवाई करण्यापूर्वीच त्यांच्यापर्यंत मेसेज पोहोचवणाऱ्यांच्याही बदल्या केल्या जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले.

Web Title: The nine assistant commissioner is a professor; The allegations of a ruling councilor in Thampa General Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.