२० दिवसांत नऊ कोरोना रुग्ण; ठाण्यात नव्या व्हेरिएंटचा अहवाल प्रतीक्षेत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 08:43 AM2023-12-21T08:43:00+5:302023-12-21T08:43:23+5:30
ठाणे पालिका रुग्णालयात स्वतंत्र कक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : शहरात २० दिवसांत कोरोनाचे नवे नऊ रुग्ण आढळून आल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. देशात काही राज्यांत ‘जेएन १’ या ओमायक्रॉनच्या नव्या उपप्रकाराच्या विषाणूची लागण झालेले रुग्ण आढळून येत आहेत. ठाण्यात लागण झालेल्या रुग्णांच्या तपासणीचे नमुने पुण्याला पाठवले असून अद्याप अहवाल पालिकेला प्राप्त झालेला नाही. त्यामुळे अधिक माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने पालिका आरोग्य विभागाने कोरोना चाचण्या वाढविण्याबरोबरच कळव्याच्या रुग्णालयात कोरोना रुग्णांकरिता स्वतंत्र कक्ष उभारला आहे.
मंगळवारी कोरोनाबाधित महिला आढळून आली. ती मूळची बिहारची आहे. पतीसोबत ती १५ दिवसांपूर्वी ठाण्यात आली. तिला ताप, दमा आणि सर्दी असा त्रास होत होता. तिचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आली. तिच्यावर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील विशेष कक्षातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.
डिसेंबर महिन्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले. गेल्या २० दिवसांत शहरात नऊ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी केवळ एका रुग्णाची प्रकृती चिंताजनक असून तिला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील विशेष कक्षात उपचारासाठी दाखल केले आहे. उर्वरित रुग्ण गृहविलगीकरणात राहून उपचार घेत आहेत.
घाबरून जाऊ नका; फक्त काळजी घ्या !
कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने पालिका आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. दिवसाला २०० चाचण्या करण्यात येत असून, त्यात १२० शीघ्र प्रतिजन, तर आठ आरटीपीसीआर चाचण्या करण्यात येतात. कोरोनाची लक्षणे असणाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. तसेच विशेष कक्ष उभारण्यात आला आहे. त्या ठिकाणी एकूण २० खाटा आहेत.
शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार दर महिन्याला सुमारे २५ रुग्णांचे नमुने पुणे येथील एनआयव्ही येथे तपासणीसाठी पाठविण्यात येतात. डिसेंबर महिन्यात एकूण नऊ रुग्ण आढळून आले असून, त्यापैकी सात रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. त्याचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत.