कोविड केअर सेंटरसाठी नऊ कोटी ६७ लाख मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 02:41 AM2020-08-07T02:41:21+5:302020-08-07T02:41:29+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिका : स्थायी समितीची आॅनलाइन सभा
कल्याण : केडीएमसीच्या स्थायी समितीची सभा गुरुवारी आॅनलाइनद्वारे पार पडली. या सभेत कोरोना रुग्णांसाठी उभारलेल्या कोविड केअर सेंटर व विलगीकरण कक्षासाठी नऊ कोटी ६७ लाख रुपये खर्चास मंजुरी देण्यात आली. स्थायी समितीचे सभापती विकास म्हात्रे यांनी समितीच्या सभागृहातून सर्व सदस्यांशी आॅनलाइनद्वारे संपर्क साधला. या सभेला शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
डोंबिवली क्रीडासंकुलातील कोविड केअर सेंटर व रुग्णालयाच्या कामासाठी तीन महिन्यांसाठी ५६ लाख ३४ हजार रुपये, पाच महिन्यांच्या खर्चासाठी ७१ लाख ९९ हजार रुपये, तर सहा महिन्यांच्या खर्चास ७९ लाख ८२ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. डोंबिवली जिमखाना येथे उभारण्यात येत असलेल्या कोविड रुग्णालयास तीन महिन्यांसाठी एक कोटी ६४ लाख रुपये, चार महिन्यांसाठी एक कोटी ८९ लाख रुपये, पाच महिन्यांसाठी दोन कोटी १३ लाख रुपये खर्चास मान्यता दिली आहे. डोंबिवली जिमखान्यात कोविड सेंटरसाठी वीजपुरवठा व जनरेटरच्या सुविधेसाठी एक कोटी ३० लाख रुपये आणि ९१ लाख रुपये खर्चास मंजुरी देण्यात आली आहे.
याशिवाय, टिटवाळा परिसरातील विलगीकरण कक्ष उभारण्यासाठी ४८ लाख २८ हजार रुपये, ‘जे’ प्रभागातील विलगीकरण कक्षासाठी १० लाख ७३ हजार रुपये खर्चास मान्यता दिली आहे.
‘जे’ प्रभागात अन्य एका ठिकाणी विलगीकरण कक्ष उभारण्यासाठी २५ लाख ५५ हजार रुपये खर्चास मंजुरी दिली आहे. यापैकी डोंबिवली क्रीडासंकुलातील कोविड सेंटर सुरू झालेले आहे.
दरम्यान, डोंबिवली पूर्वेतील जिमखाना येथील कोविड रुग्णालय अद्याप सुरू होणे बाकी आहे. हे सेंटर १० आॅगस्टपर्यंत सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.
धोकादायक इमारती पाडण्याच्या निविदेस मंजुरी
च्मनपा हद्दीतील धोकादायक व अतिधोकादायक इमारती पाडण्यासाठी निविदा मागवण्यात आली होती. या कामासाठी आलेली देविदास चव्हाण यांची निविदा मंजूर करण्यात आली आहे. त्यांच्या दरपत्रकानुसार धोकादायक व अतिधोकादायक इमारती पाडण्याचे काम केले जाणार आहे.
च्महापालिका दरपावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धोकादायक इमारती पाडण्याच्या नोटिसा संबंधित मालकांना देते. मात्र, अनेकदा इमारतधारक इमारत पाडून घेत नाहीत. त्यामुळे आता कंत्राटदाराकडून या इमारती पाडल्या जाणार आहेत.
च्सध्या कोरोना परिस्थितीत इमारती पाडून नागरिकांना बेघर करू नये. हाताला काम नसल्याने अनेक जण चार महिन्यांपासून घरात आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्या घरावर हातोडा चालविणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.