राज्य कामगार रुग्णालयात विद्युत सामग्री पुरविणा-याची नऊ लाख २५ हजारांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 10:23 PM2018-01-11T22:23:31+5:302018-01-11T22:29:48+5:30
ठाण्याच्या लोकमान्यनगर येथील शिवमंगल चौरसिया यांच्याकडून राज्य कामगार रुग्णालयासाठी १५ लाख ५० हजारांची विद्युत सामग्री खरेदी करुनही मुख्य ठेकेदाराने त्यांचे नऊ लाख २५ हजारांची फसवणूक केली.
ठाणे: राज्यभरातील कामगार विमा रुग्णालयात विद्युत सामग्री पुरवणा-या किंगफोर्ट कन्स्ट्रक्शन कंपनीचे भागीदार जतीन सेठी यांनी त्यांचा ठेकेदार महेश विश्वकर्मा यांच्याशी संगनमत करुन आर. आर. इलेक्ट्रीकल्स कंपनीची नऊ लाख २५ हजारांची फसवणूक केल्याचा गुन्हा वर्तकनगर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.
‘किंगफोर्ट कन्स्ट्रक्शन’चे सेठी यांनी ठेकेदार विश्वकर्मा याच्या मदतीने ठाण्याच्या लोकमान्य नगर येथील शिवमंगल चौरसिया यांच्याकडून आर. आर. केबल आणि आर. आर. इलेक्ट्रीकल्स कंपनीचे १५ लाख ५० हजार ७९८ रुपये किंमतीचे विद्युत साहित्य खरेदी केले. १ फेब्रुवारी २०१६ ते १९ मार्च २०१६ या कालावधीत मुंबई, ठाण्यासह महाराष्टÑातील कामगार विमा रुग्णालयासाठी ही विद्युत सामग्री घेण्यात आली होती. त्यापोटी चौरसिया यांना ५ मार्च २०१६ ते ९ जानेवारी २०१८ या कालावधीत सहा लाख २५ हजारांचे बिल देण्यात आले. मात्र, त्यांचे उर्वरित नऊ लाख २५ हजार ७८९ रुपये न देता त्यांची फसवणूक केली. याबाबत त्यांनी वारंवार पाठपुरावा करुनही ‘एनपीसीसी’कडून पेमेंट झाले नसल्याची बतावणी केली गेली. त्यांनी महेश विश्वकर्मा यांच्याकडे बिलाबाबत विचारणा केली असता, त्यांनीही किंगफोर्टमध्ये केलेल्या कामाचे आपल्याला पेमेंट मिळाले नसल्याचे सांगून त्यांची दिशाभूल केली. वारंवार पाठपुरावा करुनही सेठी आणि विश्वकर्मा यांच्याकडून पैसे चुकते न झाल्याने अखेर चौरसिया यांनी ९ जानेवारी रोजी या दोघांविरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल केली. उपनिरीक्षक सुहास हटेकर याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.