ठाणे आयुक्तालयातील आणखी नऊ पोलिसांनी केली कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 07:43 PM2020-05-29T19:43:26+5:302020-05-29T19:46:56+5:30
आतापर्यंत १३६ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली असून दहा अधिकाऱ्यांसह ८० पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. शुक्रवारी एकाच दिवसात नऊ पोलिसांनी कोरोनावर मात केल्याने ठाणे पोलिसांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिसांकडून होणा-या प्रयत्नांबद्दल तसेच त्यांच्या कामाचे ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: आतापर्यंत ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील १५ अधिकारी तसेच १२१ कर्मचारी अशा १३६ पोलिसांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी एका महिला पोलिसाचा मृत्यु झाला असून दहा अधिकाºयांसह ८० पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. शुक्रवारी एकाच दिवसात नऊ पोलिसांनी कोरोनावर मात केल्याने ठाणे पोलिसांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू असल्यामुळे अनेक भागांमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे. पोलिसांचा नागरिकांशी थेट संपर्क येत असल्यामुळे ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील तब्बल १३६ पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. अशा कोरोनाबाधित पोलिसांवर ठाण्यातील वेदांत, होरायझन, सफायर, निआॅन, लिरीडा हॉटेल, भार्इंदरपाडा, काळसेकर हॉस्पीटल, मुंब्रा तसेच कल्याणच्या होलीक्रॉस, भिवंडीतील टाटा आमंत्रा आणि मुंबईतील सेव्हन हिल्स आदी रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहेत. २९ मे रोजी ठाण्यातील सफायरमधून ६, वेदांत, काळसेकर आणि सेव्हन हिलमधून प्रत्येकी एक अशा नऊ पोलिसांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली. या सर्वांचे ठाणे पोलिसांनी जल्लोषात स्वागत केले.
* आतापर्यंत ठाणे पोलीस आयुक्तालयातील १५ अधिकारी आणि १२१ कर्मचारी बाधित झाले. त्यांच्यापैकी १० अधिकारी आणि ७० कर्मचारी अशा ८० जणांनी कोरोनावर मात केली. यात श्रीनगर पोलीस ठाण्याच्या महिला पोलिसाचा मृत्यु झाला. सध्या पाच अधिकारी आणि ५० कर्मचारी अशा ५५ पोलिसांवर वेगवेगळया रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून ते लवकरच बरे होऊन त्यांच्या कर्तव्यावर रुजू होतील, असा विश्वास पोलिसांमधून व्यक्त होत आहे.
*पोलीस आयुक्तांकडून घेतला जातो नियमित आढवा
रुग्णालयात दाखल केलेल्या कोरोनाबाधित पोलीस अधिकारी तसेच कर्मचाºयांशी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, सह पोलीस आयुक्त सुरेश मेकला हे नियमित संपर्कात राहतात. त्यांना योग्य उपचार मिळावेत, यासाठीही ते वैद्यकीय अधिका-यांच्या संपर्कात असतात. कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण पोलिसांमध्ये लक्षणीय असून रुग्णालयातून बरे झाल्यानंतर अनेक पोलीस पुन्हा कामावर रुजू झाले आहेत.
...........................
* पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले कौतुक
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची त्यांच्या कार्यालयात शुक्रवारी दुपारी भेट घेतली. त्यावेळी त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून होत असलेल्या कामाचे कौतुक केले. कोरोनाबाधित पोलिसांचीही त्यांनी यावेळी माहिती घेतली.