...तर ठामपा करणार नऊ हजार मालमत्ता जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 11:57 PM2018-12-03T23:57:28+5:302018-12-03T23:57:34+5:30

आगामी लोकसभा निवडणुकीच्या काळात महापालिकेतील कर्मचारी कामात व्यस्त होणार असल्याने महापालिकेने मालमत्ताकर वसुलीसाठी जप्तीची कारवाई सुरू केली आहे.

Nine thousand assets were seized | ...तर ठामपा करणार नऊ हजार मालमत्ता जप्त

...तर ठामपा करणार नऊ हजार मालमत्ता जप्त

Next

ठाणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या काळात महापालिकेतील कर्मचारी कामात व्यस्त होणार असल्याने महापालिकेने मालमत्ताकर वसुलीसाठी जप्तीची कारवाई सुरू केली आहे. यासंदर्भात पालिकेने १० प्रभाग समित्यांमध्ये १७६ ब्लॉक तयार केले असून यामधील जास्तीची थकबाकी असलेल्या प्रत्येक ब्लॉकमधील ५० याप्रमाणे तब्बल आठ हजार ८०० थकबाकीदारांची यादी तयार केली आहे. या थकबाकीदारांनी वेळेत मालमत्ताकर भरला नाही, तर ३१ डिसेंबरनंतर त्यांच्यावर जप्तीची कारवाई अटळ असल्याचे पालिका सूत्रांनी स्पष्ट केले.
मालमत्ताकर विभागाला यंदा ६०० कोटींचे उद्दिष्ट दिले आहे. सध्या ते ३२५ कोटींचे साध्य केले आहे. परंतु, शिल्लक उद्दिष्टाच्या पार जाण्याची तयारी पालिकेने सुरू केली असून त्यासाठी कर भरण्यासाठी डिसेंबर महिन्यापासूनच सुटीच्या दिवशी कार्यालये खुली ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. असे असतानाच आता पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर निवडणुकीच्या कामात अधिकारी-कर्मचारी व्यस्त होणार असल्याची बाब लक्षात घेऊन प्रशासनाने डिसेंबरअखेरपर्यंत मालमत्ताकराच्या उद्दिष्टाच्या जवळपास पोहोचण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, ६०० कोटी रुपयांच्या उद्दिष्टापैकी ५०० कोटी रुपयांची वसुली करण्याचे ठरवले असून त्यानुसार प्रयत्नही सुरू केले आहेत.
महापालिका क्षेत्रात चार लाख ७० हजारांच्या आसपास मालमत्ताधारक असून त्यांचे १७६ विभागांमध्ये वर्गीकरण केले आहे. प्रत्येक विभागात दीड ते अडीच हजार मालमत्ताधारकांचा समावेश आहे. या यादीमधील पहिल्या ५० थकबाकीदारांची यादी तयार केली असून त्यांना दोन दिवसांत मोबाइल संदेश पाठवले जाणार आहेत. त्यानंतर, उर्वरित थकबाकीदारांनाही संदेश पाठवले जातील. असे असले तरी गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाने थकबाकीदारांची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई सुरू केली आहे.
>...तर करात दोन टक्के सवलत
वसुलीसाठी आॅनलाइनद्वारे कर भरण्यासाठी संकेतस्थळाचा पत्ताही दिला जाणार आहे. तसेच डीजी ठाणे अ‍ॅपवरून करभरणा केल्यास मालमत्ताकराच्या सामान्यकरात मालमत्ताधारकांना 02% सवलत मिळणार असल्याची माहिती महापालिकेचे उपायुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिली. महापालिकेचा मालमत्ताकर अद्याप जमा केलेला नाही. वसुलीची अप्रिय कारवाई (वॉरंट, जप्ती, मालमत्तेची विक्र ी) टाळण्यासाठी तो तत्काळ जमा करावा, अशा स्वरूपाचा मोबाइल संदेश पाठवण्यात येणार आहे. त्यामध्ये संपूर्ण रक्कम जमा केली असल्यास हा एसएमएस रद्द समजावा, असाही उल्लेख करण्यात येणार आहे. मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांत तो पाठवला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
>थकबाकीदारांना मोबाइलवरून कर भरण्यासंबंधी संदेश पाठवण्यास सुरुवात झाली आहे. सहामाहीतील थकबाकीदार आणि नवीन मालमत्ताधारकांनाही करवसुलीसाठी हे संदेश पाठवले जातील.

Web Title: Nine thousand assets were seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.