ठाण्याच्या डोंगर माथ्यावर अडकलेल्या नऊ पर्यटकांची सुखरुप सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 10:16 PM2018-04-09T22:16:10+5:302018-04-09T22:16:10+5:30
ठाण्याच्या संजय गांधी राष्टÑीय उद्यानामध्ये निसर्गभ्रमंतीसाठी गेलेले नऊ पर्यटक जंगलात रस्ता भरकटले. त्यांनी ठाणे पोलीस नियंत्रण कक्षाकडे ही माहिती दिल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाने त्यांची सुखरुप सुटका केली.
ठाणे: टिकूजिनी वाडीपासून जवळच असलेल्या संजय गांधी राष्टÑीय उद्यानाच्या डोंगर माथ्यावर अडकलेल्या नऊ पर्यटकांची ठाण्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाने अग्निशमन दलाच्या मदतीने सुटका केली. दुपारी २ ते ३ या एक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर वाट चुकलेल्यांना जंगलातून बाहेर काढण्यात यश आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
टिकूजिनी वाडीपासून जवळच असलेल्या महाराष्टÑ वनविभागाच्या कार्यक्षेत्रातील कल्पतरु हिल्स या मानपाडयातील संजय गांधी राष्टÑीय उद्यानाच्या जंगलात सोमवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास अर्जून घोष (१५) याच्यासह नऊ जणांचा गट फेरफटका मारण्यासाठी गेला होता. दिवसभर जंगलात भ्रमंती केल्यानंतर ते दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास रस्ता चुकले आणि आत भरकटले. रस्ताच मिळत नसल्यामुळे त्यांची भीतीने गाळण उडाली. त्यांच्यापैकीच एकाने ठाणे शहर पोलिसांच्या नियंत्रण कक्षाकडे ही माहिती देउन मदत मागितली. ठाणे पोलिसांनी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे ही माहिती दिल्यानंतर बाळकूम अग्निशमन दलाचे स्थानक अधिकारी मुल्ला मुणिर यांच्यासह आठ जणांच्या जवानांनी या तरुणांच्या गटाला आवाज देत जंगलात त्यांचा दुपारी २ वाजण्याचा सुमारास शोध घेतला. एक तासांच्या अथक प्रयत्नानंतर दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास अखेर या पर्यटकांचा शोध लागला. त्यानंतर अर्जून याच्यासह श्रुती सरनागल (१४), कृष्णा तांडेल (१५), ओम कृष्ण कामत (१५), अक्षित माहोर (१६), अनन्या शेट्टी (१६), जॉर्डन सन्स (१६) आणि तारक मोदी (४८, रा. सर्व निळकंठ वूडर्स, ठाणे) या नऊ जणांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संतोष कदम यांनी सांगितले. सुदैवाने त्यांच्यापैकी कोणीही जखमी झालेले नाही. या सर्वांनी ठाणे अग्निशमन दलाचे आभार मानले.