बालकावर अत्याचार करून निर्घृण हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 11:17 PM2019-03-08T23:17:13+5:302019-03-08T23:17:15+5:30
डोक्यात दगड टाकून त्याची हत्या करणाऱ्या मोहम्मद शकील पठाण याला ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश एस. ए. सिन्हा यांनी शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
ठाणे : डोंगरावरील पंतग काढून देण्याचे बहाण्याने आठ वर्षीय मुलाला घनदाट जंगलात नेऊन त्याच्यावर अत्याचार केल्यानंतर, डोक्यात दगड टाकून त्याची हत्या करणाऱ्या मोहम्मद शकील पठाण याला ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश एस. ए. सिन्हा यांनी शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ही घटना २०१७ रोजी मुंब्य्रात घडली होती. या खटल्यात सरकारी वकील म्हणून उज्ज्वला मोहोळकर यांनी काम पाहिले.
पीडित मुलगा १८ डिसेंबर, २०१७ रोजी घराबाहेर खेळताना आरोपीने त्याला पंतग काढून देण्याचे आमिष दाखविले. आरोपी मोहम्मद शकील पठाण हा कामगार आहे. त्याने पीडित मुलास मुंब्य्रातील देवीपाडा येथील जंगलात नेऊन, त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार तो घरी सांगेल आणि आपल्याला अटक होईल, या भीतीने त्याने मुलाचे हात-पाय वेलीने बांधले. त्यानंतर, रस्सीने गळा आवळल्यानंतर डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली. मुंब्रा पोलिसांनी त्याला १९ डिसेंबर रोजी अटक केली. सरकारी वकील उज्ज्वला मोहोळकर यांनी सादर केलेले पुरावे आणि १० साक्षीदारांची साक्ष ग्राह्य धरून न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.