नवीन वरसावे पुलाचे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याचे नितीन गडकरींचे आदेश 

By धीरज परब | Published: August 5, 2023 05:27 PM2023-08-05T17:27:00+5:302023-08-05T17:29:52+5:30

आदेश प्रशासनास दिले असल्याची माहिती खासदार राजेंद्र गावित यांनी दिली आहे. 

nitin gadkari order to blacklist the contractor who did shoddy work of new versova bridge | नवीन वरसावे पुलाचे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याचे नितीन गडकरींचे आदेश 

नवीन वरसावे पुलाचे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याचे नितीन गडकरींचे आदेश 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क,  मीरारोड - मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर खाडी वरील नवीन वरसावे पुल मार्च अखेरीस खुला होत नाही तोच पहिल्याच पावसात पुलावर अनेक खड्डे पडल्या प्रकरणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्यासह त्याच्यावर कडक कारवाई करा आणि पुन्हा काम देऊ नका असे आदेश प्रशासनास दिले असल्याची माहिती खासदार राजेंद्र गावित यांनी दिली आहे . 

जुना पूल कमकुवत झाल्याने होणारी वाहतूक कोंडी व धोका टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मुंबई - अहमदाबाद महामार्गावर २४७ कोटी खर्चून नवीन उड्डाणपूल बांधला . काही वर्ष रखडलेला हा नवीन ४ पदरी पूल २८ मार्च रोजी वाहतुकीसाठी खुला केल्याचे मंत्री गडकरी यांनी जाहीर केले होते .  मात्र पावसाळा सुरु झाला आणि जून पासूनच पुलावर अनेक खड्डे पडून रस्त्याखालील लोखंडी सळ्या दिसू लागल्या . यामुळे अपघाताचा धोका वाढून वाहन चालवणे जिकरीचे बनले . नवीन पुलावर पडलेल्या खड्डे प्रकरणाने टीकेची झोड उठली . 

खा . गावित यांनी या प्रकरणी महामार्ग प्राधिकरणा कडे ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती .  पुलावर खड्डे पडून लोकांच्या जीवितास व सुरक्षिततेस धोका निर्माण केल्या बद्दल २६ जुलै रोजी काशीमीरा पोलीस ठाण्यात ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला . नव्या वरसावे पुलावर अवघ्या तीन महिन्यात खड्डे पडून जवळपास ६८ ठिकाणी सळया बाहेर आल्या असून चालकांना मोठा त्रास सहन करावा लागून अपघाताची शक्यता आहे . पुलाच्या कामाच्या गुणवत्तेवर  प्रश्नचिन्ह उपस्थित होऊन जनता सुद्धा नवीन पुल असताना खड्डे कसे पडले ? असा प्रश्न करत असल्याची बाब खा . गावित यांनी दिल्लीत शुक्रवारी मंत्री गडकरी यांची भेट घेऊन निदर्शनास आणून दिली . 

गडकरी यांनी तात्काळ संबधित अधिकाऱ्यास कॉल करून जाब विचारला व  नाराजी व्यक्त केली.  विकास कामे होत असताना त्याच्या दर्जा बाबत अजिबात तडजोड सहन केली जाणार नाही . निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर कडक कारवाई करा. त्याला काळया यादीत टाका व पुढचे टेंडर घेऊ देऊ नका असे आदेश गडकरी यांनी संबधित अधिकाऱ्यास आपल्या समक्ष दिल्याचे खा . गावित म्हणाले. मुंबई - अहमदाबाद महामार्गावर होणार पूरस्थिती व त्याचे कारणे खा . गावित यांनी गडकरी यांच्या निदर्शनास आणून देत कारवाईचे आदेश देण्याची विनंती केली . तसेच महामार्गावर रुग्ण वाहिका, क्रेन, अग्नि शमन वाहन , एक फिरता दवाखाना,  ट्रॉमा केअर सेंटर आदी सुविधा आवश्यक असल्याने त्या उपलब्ध करून देण्याची मागणी केली . त्यावर कार्यवाही चे आश्वासन गंडकरी यांनी दिले असल्याचे खा . गावित यांनी सांगितले . 

Web Title: nitin gadkari order to blacklist the contractor who did shoddy work of new versova bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.