ठाण्याच्या जलवाहतुकीसाठी तीन आठवड्यात केंद्राशी करार करण्याच्या केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या पालिकेला सुचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 07:04 PM2018-02-12T19:04:01+5:302018-02-12T19:07:22+5:30
ठाण्याच्या जलवाहतुकीसंदर्भात आणखी एक पाऊल पडले असून, येत्या तीन आठवड्यात या प्रकल्पाबाबत केंद्राशी करार करण्याच्या सुचना केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी ठाणे महापालिकेला दिल्या आहेत.
ठाणे - ठाणे महानगरपालिकेच्यावतीने तयार करण्यात आलेल्या अंतर्गत जलवाहतूक प्रकल्पाला गती मिळणार असून सोमवारी केंद्रीय जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या दालनात महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केलेल्या योजनेच्या सादरीकरणानंतर महापालिकेने तीन आठवड्यात या प्रकल्पाबाबत केंद्राशी करार करण्याच्या सूचना गडकरी यांनी महापालिका आयुक्तांना दिल्या. तर जलवाहतुकीसाठी बोटींबरोबर जमीन तसेच पाण्यावर चालणाऱ्या अॅफीबियस बसचाही वापर करण्याची सुचना गडकरी यांनी यावेळी दिल्या.
या बैठकीस खासदार राजन विचारे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि केंद्र सरकारच्या अंतर्गत जलवाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अंतर्गत जलवाहतूक या महत्वाकांक्षी प्रकल्पातंर्गत ठाणे-वसई-कल्याण, ठाणे ते मुंबई आणि ठाणे ते नवी मुंबई या मार्गावर जलवाहतूक सेवा सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. यासंर्दभातील तपशीलवार प्रकल्प अहवाल तज्ज्ञ सल्लागार मे. मेडुला सॉप्ट टेक्नॉलॉजीज या कंपनीच्या माध्यमातून करण्यात आला आहे. यासंदर्भातील सादरीकरण महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सोमवारी वाहतूक भवनात गडकरी यांच्यासमोर सादर केले. यावेळी या प्रकल्पाच्या प्रगतीविषयी समाधान व्यक्त करूनगडकरी यांनी ठाणे महानगरपालिकेने तीन आठवड्यात केंद्र सरकारच्या अंतर्गत जलवाहतूक प्रकल्प विभागाशी सामंजस्य करार करावा जेणेकरून या प्रकल्पासाठी लागणाºया निधीचे वितरण करणे सुलभ होईल असे सांगितले. तसेच या प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी त्यांनी आयआयटी, चेन्नई, जेएनपीटी, बीपीटी आणि कोचीन शीपयार्ड या संस्थांशीही समन्वय साधण्याच्या सूचना देतानाच या प्रकल्पातंर्गत जागतिक दर्जाच्या सुविधा आणि तंत्रज्ञान पुरविण्याबाबत त्यांनी महापालिकेस आश्वासन दिले. हा प्रकल्प यशस्वीपणे चालावा यासाठी प्रकल्पाच्या दुरूस्तीचे आणि निगा व देखभालसाठी प्रकल्प परिसरातच अत्याधुनिक केंद्र उभारण्याच्या सूचना देतानाच या प्रकल्पामुळे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील नागरिकांना कमी वेळात प्रदुषणविरहित जागतिक दर्जाची सुविधा मिळणार असल्याचे त्यांनी या बैठकीत स्पष्ट केले.
दरम्यान हा प्रकल्प दोन टप्प्यात पूर्ण करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात ही सेवा वसई-ठाणे-कल्याण या मार्गावर सुरू करण्यात येणार असून त्यासाठी लागणारा निधी केंद्र सरकारकडून प्राप्त होणार आहे. या प्रकल्पातंर्गत चालविण्यात येणाऱ्या बोटी या सीएनजी आणि मिथेनॉलवर चालणाऱ्या असल्याने ही वाहतूक प्रदुषणविरहित असणार आहे. तसेच कल्याण-ठाणे-मुंबई जलवाहतुकीसाठी बोटींबरोबरच जमीन तसेच पाण्यावर चालणाऱ्या अँफिबियस बसचाही वापर करण्याची सूचना गडकरी यांनी केली. या जलवाहतूक आराखड्यात दिव्याचाही समावेश करण्याची मागणी यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीच्या तुलनेत हा किफायतशीर पर्याय ठरणार असल्यामुळे दिव्याचा देखील या प्रकल्पात समावेश करण्याची मागणी त्यांनी केली.