हेल्थ रिसर्चमध्ये नितीश नाडकर्णी देशात दहावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 01:41 AM2018-05-29T01:41:21+5:302018-05-29T01:41:21+5:30
नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ एपीडेमिआॅलॉजी, इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च आणि नॅशनल प्रोग्रॅम फॉर टेक्नॉलॉजिकली एन्हॅण्स्ड लर्निंग यांनी घेतलेल्या ‘हेल्थ रिसर्च फंडामेंटल्स’ या परीक्षेत शहरातील नितीश नाडकर्णी देशात दहावा आला.
जान्हवी मोर्ये
डोंबिवली : नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ एपीडेमिआॅलॉजी, इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च आणि नॅशनल प्रोग्रॅम फॉर टेक्नॉलॉजिकली एन्हॅण्स्ड लर्निंग यांनी घेतलेल्या ‘हेल्थ रिसर्च फंडामेंटल्स’ या परीक्षेत शहरातील नितीश नाडकर्णी देशात दहावा आला. त्यामुळे टॉपर आॅफ इंडियाच्या यादीत त्याची गणना झाली असून, त्याला एलिट गोल्ड मेडलिस्टचा बहुमान मिळाला आहे.
वैद्यकीय क्षेत्रात संशोधनासाठी ही परीक्षा महत्त्वाची मानली जाते. आॅनलाइन पद्धतीने झालेल्या या परीक्षेला देशभरातील ३० हजार विद्यार्थी बसले होते. त्यात ग्रॅण्ट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षाला असलेल्या नितीशने ९३ टक्के गुण मिळवले.
नितीशने या परीक्षेसाठी सरकारी कोर्स केला होता. या कोर्समध्ये काही व्हिडीओ दाखवले जातात. त्यावर आधारित काही प्रश्न विचारले जातात. त्याचा निश्चित अभ्यासक्रम नाही. नितीश सध्या न्याय वैद्यकशास्त्रात (फॉरेन्सिक मेडिसीन) ‘पॅटर्न आॅफ डेथ इन अननोन, अनक्लेम्ड बॉडीज ब्रॉट अॅट टर्शरी हेल्थ केअर सेंटर इन मुंबई’वर संशोधन करत आहे. त्याचा हा शोधनिबंध लवकरच जागतिक पातळीवरील जर्नलमध्ये प्रकाशित होणार आहे. लहानपणापासून त्याला संशोधनाची आवड आहे. मानव कल्याणच्या उद्देशाने संशोधनात त्याला अधिक रस आहे.