एनएमएमटी बसच्या धडकेने तरुणीचा मृत्यू
By admin | Published: June 7, 2015 11:42 PM2015-06-07T23:42:05+5:302015-06-08T02:04:48+5:30
एका उभ्या टेम्पोला धडक लागून स्कूटीवरून खाली कोसळलेल्या मानसी दीपक खांडेकर (१९), रा. कळवा हिला नवी मुंबई महापालिका परिवहन सेवेच्या बसने धडक दिली.
ठाणे : एका उभ्या टेम्पोला धडक लागून स्कूटीवरून खाली कोसळलेल्या मानसी दीपक खांडेकर (१९), रा. कळवा हिला नवी मुंबई महापालिका परिवहन सेवेच्या (एनएमएमटी) बसची धडक बसल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलासमोर घडली. याप्रकरणी बसचा चालक विकास बागवे (ऐरोली डेपो) याला ठाणेनगर पोलिसांनी अटक केली आहे.
सकाळी ९.३० वा.च्या सुमारास सिडको ते कळव्यातील घरी मानसी तिच्या स्कूटीवरून जात होती. दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलाजवळील पदपथाला लागूनच एक टेम्पो उभा होता. या टेम्पोला स्कूटीचा आरसा लागल्याने ती रस्त्यावर पडली. त्याच वेळी सिडको ते दिवानगर जाणार्या बसचे पुढचे चाक डोक्यावरून गेल्याने तिचा मृत्यू झाला. ठाणेनगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक एस.एच. पाटील हे अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)