२डी ईको नाही, एमआरआयची सुविधा नाही, रुग्णांचे बेहाल 

By जितेंद्र कालेकर | Published: August 16, 2023 11:17 AM2023-08-16T11:17:26+5:302023-08-16T11:18:28+5:30

ठाणे जिल्हा रुग्णालयात दररोज ७५० ते १,१५० रुग्ण येतात ओपीडीत

no 2d echo no MRI facility no patient care in thane hospital | २डी ईको नाही, एमआरआयची सुविधा नाही, रुग्णांचे बेहाल 

२डी ईको नाही, एमआरआयची सुविधा नाही, रुग्णांचे बेहाल 

googlenewsNext

जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : जिल्ह्यातील ग्रामीणसह सामान्य नागरिकांसाठी आधार असलेल्या विठ्ठल सायन्ना जिल्हा शासकीय रुग्णालयात दररोज ७५० ते १,१५० रुग्ण बाह्यरुग्ण (ओपीडी) तपासणीसाठी येतात. मंगळवारी ही संख्या जेमतेम ४५ इतकीच होती. रुग्णालयात गेल्या २४ तासांमध्ये चार  महिलांच्या तातडीच्या प्रसूती शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या. मात्र, हृदयाच्या तपासणीसाठी होणारी २डी ईको (2D Echo Test) आणि डोक्याला मार लागल्यानंतर होणारे एमआरआय या तपासण्या होत नसल्याने रुग्णांना इतरत्र जावे लागल्याची तक्रार रुग्णांनी केली.
कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच दिवशी १८ रुग्ण दगावल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. ‘लोकमत’ने मंगळवारी आढावा घेतला. वेगवेगळ्या विभागांमध्ये तपासणीला मंगळवारी दोन लहान मुले, २२ महिला आणि २१ पुरुषांसह ४५ रुग्ण आले हाेते. दरम्यान, अपघातासह तातडीची वैद्यकीय सेवा २४ तास सुरू असल्याचे सांगण्यात आले.

एका दिवसात ६१ रुग्ण दाखल

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातून सोमवारी चार, तर मंगळवारी एक रुग्ण दाखल झाला. सध्या या रुग्णालयात जनरल वाॅर्डमध्ये ३३६ बेड असून, त्यात १६८  रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये १४ ऑगस्टपासून २८ रुग्ण थेट दाखल झाले, तर कळव्याच्या रुग्णालयातून सहा आणि इतर रुग्णालयांतून २७ असे ६१ रुग्ण दाखल झाले. अतिदक्षता विभागात २४ बेड असून, ते सर्व भरले आहेत. यामध्ये २४ तासांमध्ये ११ रुग्ण दाखल झाले. चार महिलांची तातडीची प्रसूतीही यशस्वीपणे पार पडल्याची माहिती रुग्णालयाच्या प्रशासनाने दिली.

भिवंडीचे रुग्णालय सक्षम करावे 

महिलांच्या आजारांसंबंधी काही महिलांना भिवंडीच्या इंदिरा गांधी रुग्णालयातून ठाण्याच्या सिव्हिलमध्ये पाठविले होते. इकडे चांगले उपचार मिळाले, पण  तिकडे चांगल्या सुविधा मिळाल्या, तर ठाण्यापर्यंतची कसरत करावी लागणार नाही, अशी प्रतिक्रिया जरीन खान या भिवंडीच्या महिलेने व्यक्त केली. 

समन्वयासाठी डाॅक्टरांचे पथक 

कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि जिल्हा शासकीय रुग्णालयात समन्वय राहण्यासाठी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.धीरज महांगडे, डाॅ.ममता अनासपूरकर आणि डाॅ.श्रीजित शिंदे यांचे पथक नेमण्यात आले आहे, तसेच दाेन रुग्णवाहिकाही माेफत उपलब्ध राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

यांची प्रतीक्षा 

शरीर तपासणीसाठी एमआरआय, डोक्याला मार किंवा अंतर्गत रक्तस्राव असल्यास सिटी स्कॅन, त्याचबरोबर हृदय तपासणीचे २डी ईकोही या ठिकाणी नाही. त्यासाठी इतर रुग्णालयात जावे, अशी तक्रार केली.

 

Web Title: no 2d echo no MRI facility no patient care in thane hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.