ना मुबलक पाणी, ना अखंडित वीज, विकसित बदलापूरच्या नुसत्याच गप्पा

By पंकज पाटील | Published: August 24, 2024 05:38 AM2024-08-24T05:38:42+5:302024-08-24T05:39:00+5:30

बदलापूरकरांनी आंदोलनातून राजकारण्यांना दाखवला आरसा

No abundant water, no uninterrupted electricity, just talk of a developed Badlapur | ना मुबलक पाणी, ना अखंडित वीज, विकसित बदलापूरच्या नुसत्याच गप्पा

ना मुबलक पाणी, ना अखंडित वीज, विकसित बदलापूरच्या नुसत्याच गप्पा

- पंकज पाटील

बदलापूर : बदलापूर शहर जसे झपाट्याने वाढले आणि त्यासोबत लोकसंख्याही वाढली. या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत मुबलक पाणी, अखंडित वीज या मूलभूत सुविधा देण्यात प्रशासनाला, राजकारण्यांना अपयश आले.  ‘आमचे बदलापूर, विकसित बदलापूर’, असा टेंभा मिरवणाऱ्या राजकारण्यांना बदलापूरकरांनी आंदोलनातून आरसा दाखवला. आपला संताप दाखवण्यात बदलापूरकर कमी पडले नाहीत.
एकेकाळी ग्रामपंचायत असलेल्या बदलापूर आणि त्याच्या परिसराचा गाव एकत्रित करून नगरपालिका करण्यात आली.

त्यामुळे या नगरपालिकेचे नेतृत्व करणारे स्थानिक ग्रामस्थ राहिले. मात्र, आज शहर वाढत असताना, या वाढत्या शहराला मुबलक पाणी देण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांना मिळून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत १६० दशलक्ष लिटर एवढा पाणीपुरवठा केला जातो. मात्र, शहरातील गळतीचे प्रमाण २५ ते ३० टक्क्यांच्या घरात असल्यामुळे पाणी असताना शहरवासीयांना पाणी देण्यात अपयश येते. 

सोसायट्या टँकरवर अवलंबून
शहरात नव्याने विकसित होणाऱ्या कात्रप, शिरगाव, मांजर्ली, वालीवली या भागांत पाणीपुरवठा नावाला आहे. त्यामुळे नव्याने विकसित होणाऱ्या इमारतींना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे.

वाढीव पाणी मंजुरी कागदावरच
बदलापूरला पाच दशलक्ष लिटर इतके वाढीव पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी एमआयडीसीकडे अनेकवेळा बैठका झाल्या. मात्र, त्यातील केवळ दोन दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध झाला. त्यामुळे अपुऱ्या पाणीपुरवठामुळे शहरातील अनेक ठिकाणी पाणीटंचाई भेडसावत आहे.

हे तर लोड शेडिंगचे शहर...
बदलापूरमध्ये विजेची समस्याही कायम आहे. अखंडित वीजपुरवठा करणे अपेक्षित असताना दीड लाखांहून अधिक शहरवासीयांना मुबलक वीजपुरवठा होत नाही. 
अनेकवेळा वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे बदलापूरचे नावही ‘लोड शेडिंगचे शहर’, असे झाले आहे. 
नव्याने विकसित होणाऱ्या इमारतींना विजेची जोडणी देणे बंधनकारक असले, तरी वाढीव वीज उपलब्ध होत नसल्यामुळे तांत्रिक अडचणी निर्माण होतात. यासोबतच वीजपुरवठा करणारी यंत्रणादेखील अपुरी असल्यामुळे विजेचा खेळखंडोबा कायम असतो.

शिरगाव भागात पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात भेडसावते. आम्हाला या ठिकाणी टँकरवर अवलंबून राहावे लागते. काही भागात एक दिवसाआड पाणीपुरवठा होत असला, तरी तो नियमित येत नाही.
- मनोज राजगुरू, बदलापूर.

दिवसातून एक ते दोन वेळा वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार बदलापुरात सतत घडत असतो. पावसाळ्यात, तर वीजपुरवठा खंडित होण्याची गणनाच करू शकत नाही. त्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे.
- प्रदीप जाधव, बदलापूर.

Web Title: No abundant water, no uninterrupted electricity, just talk of a developed Badlapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.