अपमान करणाऱ्यावर कारवाई नाही; आता ठाणे जि.प.च्या चालकांकडून आंदाेलनाची तयार!
By सुरेश लोखंडे | Published: February 24, 2024 05:19 PM2024-02-24T17:19:46+5:302024-02-24T17:21:29+5:30
जिल्ह्याभरातील संतापलेल्या चालकांकडून आता ४ मार्च राेजी तीव्र आंदाेलन छेण्याचा इशारा जिल्हा परिषदेला देण्यात आला आहे.
ठाणे : जिल्हा परिषदेने बदली झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांचा निराेप समारंभ बारा बंगला येथे आयाेजित केला हाेता. रात्रीच्या वेळी आयाेजित केलेल्या या कार्यक्रमाला अधिकाऱ्यांना घेऊन आलेल्या वाहन चालकांना बंगल्याच्या अवारात उभे राहण्यास मनाई करून प्रवेशव्दारावर प्रतिक्षा करायला उपस्थित लिपिकाकडून सांगण्यात आले. दरम्यान या अपमानप्रकरणी संबंधितावर त्वरीत कारवाई करा, अन्यथा आंदाेलन छेडण्याचा इशारा देऊनही आजपर्यंत कारवाई झाली नाही. त्यामुळे जिल्ह्याभरातील संतापलेल्या चालकांकडून आता ४ मार्च राेजी तीव्र आंदाेलन छेण्याचा इशारा जिल्हा परिषदेला देण्यात आला आहे.
आपल्याला बंगल्याच्या गेटवर जेवणाचे पाकीट देण्यात येईल, त्यामुळे आपण बंगल्यात उभे न राहता बाहेर गेटवर थांबावे’ असे चालकांना सांगून त्यांचा अपमान केल्याचा आराेप जिल्हा परिषदेच्या वाहन चालकांच्या ‘राज्य शासकिय वाहन चालक कर्मचारी संघटनेकडून करण्यात आलेला आहे. आतापर्यंत दाेन आठवडे हाेऊनही संबंधितावर काेणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. त्यामुळे जिल्ह्याभरातील वाहनचालकांमध्ये तीव्र संताप खदखदत आहे. त्यांनी विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकारी, सीईओ आदींना निवेदन देऊन तीव्र आंदाेलन छेडण्याचा इशारा दिला आहे. या घटनेच्या वेळी वाहनचालकांना अपमानीत करून बंगल्याच्या गेटच्या बाहेर काढण्यात आले.
रात्री उशिरापर्यंत निरोप समारंभ कार्यक्रम चालू असल्यामुळे रात्री उशीरानेच अधिकारी यांना घरी पोचवून सर्व वाहनचालक रात्री दोन वाजेपर्यंत उपाशी कार्यालयात पोचले, तर काही वाहनचालक हे रात्री लोकल सेवा व एसटी बंद असल्याने गाडीमध्ये उपाशी पोटी झोपणे भाग पडले, अशाप्रकारे वाहनचालक यांना अमानुष वागणूक देवुन छळ केल्याचा आराेपाखाली या चालकांकडून तीव्र आंदाेलन छेडण्याची तयारी करण्यात येत आहे.