नायगाव रेल्वे खाडी पूलप्रकरणी दहा दिवस उलटूनही पोलीस, जिल्हा प्रशासन व रेल्वे कडून कारवाई शून्य !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 07:12 PM2021-02-21T19:12:56+5:302021-02-21T19:13:29+5:30
वसई नायगाव खाडीवरील रेल्वे पूलाला दि.12 फेब्रुवारी ला एका मोठ्या जहाजाने (ड्रेझर) रात्रीच्या वेळी अंधारात जोरदार धडक दिल्या प्रकरणी दहा दिवस उलटूनही केवळ माणिकपूर पोलीसांनी 9 जणांवर गुन्हे नोंदवले आहेत.
आशिष राणे ,वसई
वसई नायगाव खाडीवरील रेल्वे पूलाला दि.12 फेब्रुवारी ला एका मोठ्या जहाजाने (ड्रेझर) रात्रीच्या वेळी अंधारात जोरदार धडक दिल्या प्रकरणी दहा दिवस उलटूनही केवळ माणिकपूर पोलीसांनी 9 जणांवर गुन्हे नोंदवले आहेत.
तर प्रत्यक्षात या गंभीर प्रकरणी माणिकपूर पोलीस स्टेशन असो किंवा पालघर जिल्हा प्रशासन असो का रेल्वे प्रशासन व मेरी टाईम बोर्ड आदीं यंत्रणेकडून खऱ्या दोषींवर अजूनही योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात न आल्याने संबंधित यंत्रणेबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान महाराष्ट्र (मुंबई) गुजरात राज्याना जोडणारा हा अतिमहत्त्वाच्या रेल्वे पुलाच्या सुरक्षेबाबत अद्यप ही ठोस अशी उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार म्हणून कोणतीही पाऊलं उचलत नसल्याने आता पाणजू ग्रामस्थांनी कंबर कसली आहे.
या संदर्भात ग्रामस्थांनी आता रेल्वे मंत्री पियुष गोयल व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार वजा निवेदन दिल्याची माहिती पाणजु ग्रामपंचायतीचे आशिष भोईर यांनी लोकमत ला दिली.
शुक्रवार दि.12 फेब्रुवारी रोजी 12.30 च्या सुमारास रेल्वे पुला खालून विनापरवाना रेल्वे, मेरी टाईम बोर्ड आदींची परवानगी न घेता "आर्यन" या नावाचे जहज (ड्रेजर ) चक्क नायगाव खाडी रेल्वे पुलाखालून पार होत असताना त्याने जोरदार दोन्ही रेल्वे पुलाला धडक दिली होती.
परिणामी हे जहाज या पुलाखालून जात असताना समुद्राची भरती वाढली व अचानक हा ड्रेजर दोन्ही पुलाच्या मधल्या भागात फसून पुलाचा काही भाग उचकला गेला व त्यामुळे त्याचे प्लास्टर ही निखळून पडले. प्रसंगी पुलाला जोरदार धडक लागल्याने मोठी हानी तर झाली तर रेलिंग ही वाकले होते. ही घटना एवढी भयंकर होती की, भोईर व ग्रामस्थांच्या मते जर यावेळी रेल्वे पुलावरून लोकल ट्रेन किंवा एक्स्प्रेस गाडी आली असती तर मोठा अपघात होऊन हजारो लोकांचे जीव गेले असते.
नायगाव रेल्वे खाडी चार राज्यासाठी एकमेव पूल !
अर्थातच हा एकमेव रेल्वे पूल आहे की जो गुजरात राजस्थान तसेच दिल्ली आणि मुंबईला जोडणारा आहे,त्याच्या सुरक्षा व उपाययोजनेसाठी संबंधित यंत्रणा दुर्लक्ष करीत आहे.
आणि धडक दिल्यावर ड्रेजर पाण्यात अडकून पडला ?
भरती व मोठ्या ड्रेजर मुळे हा ड्रेजर पाण्यात अडकून पडला व धडकल्यावर त्यांला तिथून काढणे शक्य नसल्याने अखेर गॅस कटरने त्यास मोठी छिद्र पाडून त्यास खाडीच्या पाण्यात बुडवून जहाजावरील सर्वजण लोकं तिथून पसार झाली
रेल्वे पुलाला धडक मारल्या ची ही तर चौथी घटना !
यापूर्वी देखील या पुलाखालून धडक देत असे अनेक ड्रेजर पास झाले आहेत मात्र असाच प्रकार त्यावेळी सन 2006 , 2010, 2014 आणि आता ही चौथी घटना असून अशा वारंवार घटना घडून सुद्धा रेल्वे प्रशासन तसेच जिल्हा व स्थानिक राज्य व केंद्र शासनाची यंत्रणा योग्य ती कारवाई करताना दिसत नाही हे गंभीर आहे. एकूणच माणिकपूर पोलीसांनी 9 जणांवर गुन्हा व काहींना अटक केली आहे मात्र यातील प्रत्यक्ष मालक व यातील दोषी वर काहीही कारवाई केली नसल्याचे समजते. आत्तापर्यंतपोलीस व रेल्वे कडून केवळ थातूरमातूर कारवाई झाली आहे.
स्थानिक पातळीवर पोलीस व रेल्वे पोलीसांची यंत्रणा नाहीच ?
विशेष म्हणजे मोठे जहाज (ड्रेजर) पुलाखालून जाण्याआधी किमान 10 ते 12 तास पुलाच्या बाजूला थांबलेले असते. असे असूनही रेल्वे प्रशासन व पूलाच्या देखरेखीखाली असलेली पोलीस, मेरी टाईम बोर्ड व रेल्वेची सुरक्षा यंत्रणा यांच्याकडून कोणतीही विचारपूस सुद्धा का बरं केली जात नाही असा प्रश्न देखील यानिमित्ताने वसईकर व पाणजु ग्रामस्थांना नेहमीच कोड्यात टाकत आहे. तरी हा पूल वाचवण्यासाठी या धडक प्रकरणाची जिल्हा व रेल्वे मंत्रालयाकडून सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी अशी गावकर्यांची विनंती असल्याचे भोईर यांनी सांगितले.