ठाण्यातील डॉ. मूस रोडवरील राज ठाकरेंच्या सभेला पोलिसांचा रेड सिग्नल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 11:22 PM2022-04-06T23:22:08+5:302022-04-06T23:22:30+5:30
अन्यत्र सभा घेतल्यास सकारात्मक विचार
जितेंद्र कालेकर
ठाणे: शनिवारी एकाच दिवशी एकाच मार्गावर अनेक कार्यक्रम असल्यामुळे तसेच राम नवमी, रमजान व इतर सणांच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर सभा घेणे हे कायदा सुव्यवस्था बिघडवू शकते. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी नाकारण्यात येत असल्याचा शेरा ठाणे पोलिसांनी मनसेच्या अर्जावर दिला आहे. अर्थात, अन्यत्र सभा घेतल्यास सकारात्मक विचार करण्यात येईल, असेही पोलिसांनी म्हटल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
गुढीपाडव्याच्या जाहीर सभेत मनसे अध्यक्षा राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे, मदरशांमधील गैरप्रकार आणि हनुमान चालिसा आदी विविध मुद्यांवर आपली आक्रमक भूमिका मांडली होती. त्या पार्श्वभूमीवर ठाण्यात ९ एप्रिल रोजी होणाऱ्या मनसेच्या या जाहीर सभेकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. ठाण्यातील गडकरी रंगायतन नाट्यगृहासमोरील डॉ. मूस रोडवर सभा घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नौपाडा पोलीस ठाण्यात परवानगीचा अर्ज दिला होता. मात्र ठाणे पोलिसांनी या सभेस परवानगी नाकारण्यात येत असल्याचा शेरा बुधवारी दिला आहे. राम नवमी, रमजान व इतर सणांच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर सभा घेणे हे कायदा सुव्यवस्था बिघडवू शकते. त्यामुळे ही परवानगी नाकारण्यात येत असल्याचे कारण ठाणे पोलिसांनी दिले आहे
सभेला गर्दी होण्याची शक्यता असून ज्या ठिकाणी सभा आयोजित करण्याचा विचार आहे ते ठिकाण रहदारीचा मार्ग आहे. त्यामुळे ही परवानगी नाकारली आहे. अन्यत्र सभा घेतल्यास सकारात्मक विचार करण्यात येईल, असेही मनसेला सुचविले आहे.
अविनाश अंबुरे,
पोलीस उपायुक्त, ठाणे शहर