ना कॉल, ना ओटीपी, तरी बँकेतून पैसे गायब! फ्री गेम, अनोळखी अॅप परमीशन देताना काळजी घ्या....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:26 AM2021-06-23T04:26:15+5:302021-06-23T04:26:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ना कॉल केला, ना ओटीपी दिला, तरी आपल्या बँक खात्यातून ऑनलाईन पैसे गायब होण्याचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ना कॉल केला, ना ओटीपी दिला, तरी आपल्या बँक खात्यातून ऑनलाईन पैसे गायब होण्याचे अनेक प्रकार सध्या पाहायला मिळतात. परंतु, ऑनलाईन व्यवहार करताना सावधानता बाळगण्याचे आवाहन ठाणे शहर पोलिसांच्या सायबर विभागाने केले आहे. गेल्या अडीच वर्षांत अशा फसवणुकीच्या ६५२ तक्रारी आल्या असून, त्याद्वारे ८० लाखांची फसवणूक झाली. त्यातील ३५ लाखांची रक्कम परत मिळविण्यात ठाणे पोलिसांना यश आले आहे.
कोरोनामुळे लावलेल्या लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन व्यवहारांना खूप महत्त्व प्राप्त झाले. प्रवासाची तिकीट खरेदी, हॉटेलमधील बिल अगदी पेट्रोल पंपावरही ऑनलाईन व्यवहार झाले. याचाच फायदा सायबर गुन्हेगारांनी घेतला. अगदी अलीकडे ठाण्यातील तीनहातनाका येथे एका तरुणाने पेट्रोलचे पैसे कार्ड स्वॅप करून भरले. परंतु, कालांतराने त्याच्या खात्यातून काही हजारांची रक्कम गेल्याचे आढळले. या प्रकरणात नौपाडा पोलिसांनी गुजरातमधून दोघांना अटक केली होती. एटीएम कार्डचा पासवर्ड माहिती केल्यानंतर पेट्रोलपंपावरील एका कर्मचाऱ्याने तो क्रमांक लक्षात ठेवून दुसऱ्याच कार्डद्वारे गुजरातच्या साथीदारांच्या मदतीने पैसे काढले होते. या प्रकरणात संबंधिताने कोणालाही ओटीपी दिला नाही की, त्याला कोणाचा कॉलही आला नाही. तरी पैसे मात्र गेले होते. अशाच एका प्रकरणात हॉटेल वेटरलाही पोलिसांनी अटक केली होती. त्यामुळे असे व्यवहार करताना आणि अनोळखी अॅप डाऊनलोड करताना खबरदारी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
* लाखो रुपयांची फसवणूक
वर्षाला साधारण २० ते २५ लाखांची लूट या ऑनलाईनच्या माध्यमातून होते. गेल्या अडीच वर्षांमध्ये ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाच परिमंडळातील ३५ पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात सुमारे ८० लाखांची ऑनलाईन फसवणूक झाली आहे.
* ३५ लाख ६८ हजारांची रक्कम मिळाली परत -
अशा फसवणुकीच्या प्रकरणात पैसे परत मिळविण्यासाठी पोलिसांच्या सायबर शाखेला प्रचंड मेहनत घ्यावी लागते. फसवणूक करणाऱ्याने पेटीएम किंवा मोबीक्विकसारख्या अॅपद्वारे पैसे घेतले किंवा ज्या बँक खात्यावर ते घेतले, तिथून त्याने ते काढले तर ते मिळविण्यात अनेक अडचणी असतात. पण पेटीएम किंवा मोबीक्विकमधून ते काढले गेले नाही तर या अॅप तसेच संबंधित बँकेला पत्र देऊन हे पैसे परत मिळविता येतात. ठाणे शहर पोलिसांनी गेल्या अडीच वर्षांमध्ये ३५ लाख ६८ हजार ११३ इतकी रक्कम तक्रारदारांना परत मिळवून दिल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय येनपुरे यांनी ‘लोकमत’ला दिली.
* अनोळखी अॅप नकोच -
अशाप्रकारे ऑनलाईनद्वारे होणारी आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी कोणत्याही अनोळखी व्यक्तीने बँक किंवा कंपनीचे अॅप्लिकेशन असल्याचे सांगून टीम व्हूवर, एनीडेस्क किंवा क्विक सपोर्टसारखे अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगितल्यास आर्थिक फसवणुकीची शक्यता अधिक असते. त्यामुळे असे अॅप्लिकेशन डाऊनलोड करू नये, असा सल्ला सायबर सेलच्या पोलीस उपनिरीक्षक स्रेहल अडसुळे यांनी दिला. कोणत्याही अॅपला मोबाईलमध्ये परवानगी देताना त्यांच्या अटी काय आहेत, हे वाचावे. कोणतेही अॅप अनइन्स्टॉल करताना, अॅप इन्स्टॉल करताना दिलेल्या परमिशन डिनाईड करून मगच अॅप अनइन्स्टॉल करावे. शक्यतो, अनोळखी व्यक्ती ऑनलाईन गेम खेळू नका.
.........................
‘ऑनलाईन व्यवहार करताना सावधानता बाळगावी. तसेच मुलांना गेम खेळायची गरज असेल, तर त्यांना दुसरा मोबाईल तसेच ई-मेल आयडी द्यावा. गेम खेळताना अनोळखी प्लेअरला आपल्या वैयक्तिक व बँकेच्या डिटेल्स देऊ नयेत.’
सरदार पाटील, सहायक पोलीस आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखा, ठाणे शहर
* ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे
२०१९ -२९९
२०२० -२८६
२०२१ मेपर्यंत -६७