यापुढे ठाण्यात एकही बालक मूकबधीर राहणार नाही, महानगरपालिकेच्या 'मूकबधीर बालक मुक्त ठाणे' योजनेचा शुभारंभ

By अजित मांडके | Published: March 16, 2024 03:36 PM2024-03-16T15:36:58+5:302024-03-16T15:37:18+5:30

दोन्ही कानांसाठी कॉकलिअर इन्प्लांटच्या शस्त्रक्रियेसाठी मदत करणारी ठाणे महापालिका देशात पहिली

No child will be deaf mute in Thane anymore Municipal Corporation s Mute Child Free Thane scheme launched | यापुढे ठाण्यात एकही बालक मूकबधीर राहणार नाही, महानगरपालिकेच्या 'मूकबधीर बालक मुक्त ठाणे' योजनेचा शुभारंभ

यापुढे ठाण्यात एकही बालक मूकबधीर राहणार नाही, महानगरपालिकेच्या 'मूकबधीर बालक मुक्त ठाणे' योजनेचा शुभारंभ

ठाणे : ठाणे महानगरपालिकेने पुढाकार घेऊन सुरू केलेल्या 'मूकबधीर बालक मुक्त ठाणे' या उपक्रमात महापालिका क्षेत्रात जन्माला येणाऱ्या प्रत्येक नवजात बालकाचे स्क्रिनिंग केले जाईल. त्यामुळे कर्ण दोष असलेल्या सर्वच नवजात बालकांचे तत्काळ निदान होईल. तसेच, त्यावर जलद उपचार होतील. त्यामुळे लवकरच ठाण्यात एकही बालक मुकबधीर राहणार नाही, असा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला. ठाणे महानगरपालिकेच्या  'मूकबधीर बालक मुक्त ठाणे' या योजनेचे उद्घाटन आणि आदर्श कार्यपद्धतीचे प्रकाशन शनिवारी सकाळी त्यांच्या हस्ते झाले.

महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे झालेल्या या समारंभास व्यासपीठावर, आमदार प्रताप सरनाईक, आमदार निरंजन डावखरे, रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के, माजी महापौर मिनाक्षी शिंदे, प्रख्यात ईएनटी तज्ज्ञ डॉ. प्रदीप उप्पल, डॉ. आशिष भूमकर, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे उपस्थित होते. महापालिकेने केलेल्या आर्थिक मदतीमुळे कॉकलिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया झालेली मुले, त्यांचे पालक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्यात, डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या वतीने, बालकांच्या स्क्रिनिंगसाठी लागणारी चार उपकरणे (ओऐई) महापालिकेच्या चार प्रसूतीगृहांना वितरित करण्यात आली.

पायाभूत सुविधांच्या दृष्टीने ठाणे बदलू लागले आहे. तसाच विकास आरोग्य क्षेत्राचाही होत आहे. बरेचदा ज्या गोष्टी दिसतात त्या करण्याकडे आमचा भर असतो. न दिसणाऱ्या मात्र आवश्यक असणाऱ्या गोष्टी तज्ज्ञ मंडळी लक्षात आणून देतात. त्यातूनही या अशा योजना आकार घेतात, असेही खासदार शिंदे म्हणाले. दोन्ही कानांसाठी कॉकलिअर इन्प्लांट देणारी ठाणे महापालिका ही देशातील पहिलीच महापालिका आहे, असेही त्यांनी सांगितले.

महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी  'मूकबधीर बालक मुक्त ठाणे' या योजनेची तसेच, त्यासाठी महापालिकेने हाती घेतलेल्या कार्यपद्धतीची माहिती दिली. ठाणे महापालिकेतर्फे आतापर्यंत कर्णदोष असलेल्या बालकांच्या उपचारासाठी रुपये दोन ते अडीच लाखांपर्यंतची मदत केली जात होती, त्याचा फायदा आतापर्यंत अनेक बालकांना झाला आहे. आतापर्यंत सुरू असलेल्या या योजनेचे स्वरूप आमुलाग्र बदलून ही योजना सर्वकष आणि सर्वव्यापी करण्यात आली असल्याचे बांगर म्हणाले.

नवीन योजनेत ठाणे महापालिका क्षेत्रातील महापालिकेच्या किंवा खाजगी प्रसूतिगृहात जन्मलेल्या कोणत्याही बालकात कर्णदोष असेल तर त्याला योजनेचा लाभ घेता येणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील रुग्णालयात जन्माला येणाऱ्या सर्व नवजात बालकांची कर्ण दोषासाठी ओएई स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. त्यामुळे निदान लवकर होऊन उपचार जलद करणे शक्य होईल. ऑपरेशन झाल्यावर स्पीच थेरपीसाठीही मदत या योजनेत केली जाणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात एकही बालक मूकबधीर राहू नये, असा संकल्प केलेला असून त्यासाठी महापालिकेसोबत सर्व खाजगी रुग्णालयाचे सहकार्य अपेक्षित आहे, असे त्यांनी सांगितले.

Web Title: No child will be deaf mute in Thane anymore Municipal Corporation s Mute Child Free Thane scheme launched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे