ठाण्यात ना डम्पिंग ग्राउंड, ना कचरा वर्गीकरण; केवळ पोस्टरबाजी आणि फलकबाजीवरच खर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 12:13 AM2020-01-12T00:13:29+5:302020-01-12T00:14:29+5:30

स्वच्छ सर्वेक्षणाच्या माध्यमातून शहरातील साफसफाईवर भर देतानाच शहर विदु्रप होणार नाही, याची काळजी पालिकेने घेणे आवश्यक आहे.

No dumping ground, no garbage classification in Thane | ठाण्यात ना डम्पिंग ग्राउंड, ना कचरा वर्गीकरण; केवळ पोस्टरबाजी आणि फलकबाजीवरच खर्च

ठाण्यात ना डम्पिंग ग्राउंड, ना कचरा वर्गीकरण; केवळ पोस्टरबाजी आणि फलकबाजीवरच खर्च

googlenewsNext

ठाणे शहराने स्वच्छ शहरांच्या यादीत मागील वर्षी ५७ वा क्रमांक मिळवला होता. परंतु यंदा पहिल्या १० मध्ये येण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी तीन कोटींंच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. परंतु यंदाही पालिकेला ओला आणि सुका कचरा वेगळा करता आलेला नाही. हक्काचे डम्पिंग ग्राउंड मिळवता आलेले नाही. त्यामुळे शहर स्वच्छ दिसत असले तरी याच कारणामुळे पालिकेचा क्रमांक पुन्हा घसरण्याची शक्यता आहे. मात्र, असे असले तरी स्वच्छ सर्वेक्षणाच्या निमित्ताने महापालिका कामाला लागलेली दिसत आहे, ज्या शौचालयांना कडीकोयंडा नसायचा, स्वच्छतेचा बोजवारा उडालेला असायचा, पाण्याची सोय नसायची, कचरा उचलला जात नव्हता, ती कामे यानिमित्ताने होताना दिसत आहेत. इतर काळात मात्र जैसे थे अशीच परिस्थिती दिसून येत आहे.

२०१४ पासून केंद्र सरकारच्या माध्यमातून स्वच्छ सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार, ठाणे महापालिकेच्या माध्यमातून पहिल्या दोन वर्षी स्वच्छतेविषयी जागरूकता व्हावी, यासाठी पालिकेचे अधिकारी रस्त्यावर उतरून साफसफाई करताना दिसले होते. मात्र, त्यानंतर परिस्थितीत फारसा फरक नाही. पालिकेचा क्रमांक घसरल्याचे मागील वर्षी दिसून आले. दोन वर्षांपूर्वी पालिकेचा क्रमांक हा ४० वा होता. मागील वर्षी पालिका आणखी १७ अंकांनी घसरली व तिला ५७ वा क्रमांक मिळाला. हक्काचे डम्पिंग ग्राउंड नसणे, ओल्या आणि सुक्या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट न लावणे, या कारणांमुळे पालिकेचा क्रमांक घसरल्याचे बोलले जाते.

शहराच्या विविध भागांतील कचºयाची समस्या सुटल्यासारखी दिसत असली तरी ती व्यावसायिकांच्या ठिकाणीच सुटलेली दिसून येत आहे. आजही मुंब्रा, कळवा, दिवा, वागळे इस्टेट, इंदिरानगर आदींसह झोपडपट्टी भागात कचºयाची किंवा शौचालयांची अवस्था बिकट आहे. त्या ठिकाणचा कचरा गोळा करण्यासाठी घरोघरी जाऊन कचरा वेचणे, घंटागाडीद्वारे कचरा गोळा करणे एवढीच कामे होताना दिसतात. तेथे रस्ते सफाई फारशी होताना दिसत नाही. आजघडीला स्वच्छ सर्वेक्षणासाठी महापालिकेकडे ४५०० कर्मचाऱ्यांची टीम कार्यरत आहे. स्वच्छ सर्वेक्षण सुरू नसतानाही हीच टीम शहरात काम करीत असते, असा दावा पालिका करीत आहे. त्यांच्या जोडीला ५५ स्वच्छता निरीक्षक, १० उपमुख्य स्वच्छता निरीक्षक, एक मुख्य स्वच्छता निरीक्षक आदींची फळी काम करताना दिसत आहे.

महापालिका हद्दीत ८५० सार्वजनिक शौचालयांचे युनिट आहेत. आता स्मार्ट सिटीद्वारे २० स्मार्ट टॉयलेट उभारले जात आहेत. हे जरी असले तरी पालिका मुख्यालयातील शौचालयांचीच अवस्था फारशी चांगली नाही. तिसºया मजल्यावर पालिकेने स्मार्ट टॉयलेटचा प्रयोग केला. परंतु हा प्रयोग सपशेल फसला आहे. दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे तेथे कुणी फिरकत नाही. शहरातील इतर स्मार्ट टॉयलेटची काय अवस्था होईल, हे यावरून स्पष्ट होते. स्वच्छ सर्वेक्षणात पालिकेचा क्रमांक वरचा यावा, या उद्देशाने मागील वर्षी स्वच्छ प्रभाग ही अनोखी संकल्पना राबविण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. स्वच्छ प्रभागासाठी पहिले बक्षीस ५० लाखांचे जाहीर केले होते तर दुसरे आणि तिसरे क्रमांकाचे बक्षीस हे अनुक्रमे ३० आणि २० लाखांचे होते. मात्र ही स्पर्धा कागदावरच आहे. केवळ स्वच्छ सर्वेक्षणासाठी आम्ही काय काय करतो, हेच दाखविण्याचा हा फंडा होता. सोसायट्यांनी त्यांच्या कचºयाची विल्हेवाट लावणे, हा निर्णयही फसल्याचे दिसत आहे. यंदाही महापालिकेने शहरातील ४५० हून अधिक सोसायट्यांना नोटिसा बजावल्या आहेत. परंतु, पुढे काहीच झाले नाही. यामध्ये राजकीय हस्तक्षेप झाल्याने हाही प्रयोग फसला.

केवळ पोस्टरबाजी आणि फलकबाजीवरच खर्च
स्वच्छ सर्वेक्षणाच्या माध्यमातून शहरातील साफसफाईवर भर देतानाच शहर विदु्रप होणार नाही, याची काळजी पालिकेने घेणे आवश्यक आहे. परंतु छोट्यामोठ्या, पोस्टर, होर्डिंग्जच्या माध्यमातून पालिकेने शहरभर स्वत:च विद्रुपीकरणात भर घातली आहे. यानिमित्ताने भिंती रंगवण्याचा धडाका लावला आहे. यासाठी तीन कोटींचा खर्च केला गेला आहे. वास्तविक, हाच खर्च स्वच्छतेसाठी केला असता तर शहर स्वच्छ झाले असते. परंतु ठाणेकरांमध्ये सर्वेक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी हे करावे लागते, असे पालिकेचे म्हणणे आहे.

स्वच्छ सर्वेक्षण अ‍ॅपकडेही पाठ
स्वच्छ सर्वेक्षणासाठी केंद्राने स्वच्छ सर्व्हे अ‍ॅप सुरु केले आहे. या अ‍ॅपवर नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर त्या किती वेळात सोडविल्या जाव्या, याचे मार्गदर्शन करण्यात आले आहे. परंतु मागील तीन वर्षे प्रयत्न करुनही पालिकेला हे अ‍ॅप ठाणेकरांपर्यंत पोहोचवण्यात अपयश आले आहे. आतापर्यंत एकूण लोकसंख्येच्या १० टक्के म्हणजेच ९० हजारांच्या आसपासच ठाणेकरांनी हे अ‍ॅप डाउनलोड केल्याची माहिती पालिकेने दिली आहे. परंतु या अ‍ॅपचा वापर कितीजण करतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे. पालिकेच्या म्हणण्यानुसार या अ‍ॅपवर रोजच्या रोज ४० ते ५० तक्रारी प्राप्त होतात. परंतु त्यातील १५ ते २० तक्रारी या कचºयाच्या समस्येशी निगडित असतात. त्याचा निपटारा केला जात असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.

स्वच्छ सर्वेक्षणाच्या निमित्तानेच साफसफाई
जेव्हापासून स्वच्छ सर्वेक्षण सुरु झाले, तेव्हापासून ठाणे महापालिका हद्दीत स्वच्छतेला महत्त्व दिले जात आहे. व्यावसायिक ठिकाणी दिवसातून एकदा सफाई केली जात होती, त्याठिकाणी आता दोनदा सफाई केली जात आहे. झोपडपट्टी भागातही दिवसातून एकदा सफाई केली जात आहे. शौचालयांची सफाई केली जात आहे. परंतु शहराच्या मध्यवर्ती भागातच हे चित्र असून शहराच्या उर्वरित भागात किंवा झोपडपट्टी भागात स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचे स्पष्ट चित्र आहे.

Web Title: No dumping ground, no garbage classification in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.