उल्हासनगर महानगरपालिकेत नागरिकांना नो एन्ट्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:41 AM2021-03-31T04:41:02+5:302021-03-31T04:41:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आयुक्तांनी खबरदारीचा उपाय म्हणून तातडीच्या कामाव्यतिरिक्त सर्वसामान्य नागरिकांना महापालिकेत नो एन्ट्री ...
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आयुक्तांनी खबरदारीचा उपाय म्हणून तातडीच्या कामाव्यतिरिक्त सर्वसामान्य नागरिकांना महापालिकेत नो एन्ट्री लागू केली. शासकीय व निमशासकीय कार्यालयांत कर्मचाऱ्यांच्या ५० टक्के उपस्थितीला १५ एप्रिलपर्यंत निर्बंध घातले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर दंडात्मक कारवाईसह गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
उल्हासनगरात पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या एक हजारांपेक्षा जास्त झाल्याने महापालिका प्रशासन सतर्क झाले. रविवारी २०२, सोमवारी ७८, तर त्यापूर्वी १००पेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळले आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी २८ मार्च रोजी कोरोनाबाबत नियमावली प्रसिद्ध केली. नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई व गुन्हे दाखल करण्याचे आदेश आयुक्तांनी काढले असून, १५ एप्रिलपर्यंत आदेश लागू राहणार आहेत. महापालिका कार्यालयात तातडीच्या कामाव्यतिरिक नागरिकांना नो एन्ट्री लागू केल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. हॉटेल, सिनेमागृह, मॉल्स, सभागृह व रेस्टॉरंट रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत बंद राहणार आहेत. मात्र रेस्टॉरंटमधून होम डिलिव्हरी सुरू राहण्यास मुभा देण्यात आली.
सार्वजनिक ठिकाणे, उद्याने, मैदान रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली. नागरिकांचे तापमान मोजण्यासाठी थर्मल स्कॅनिंग, मास्क, हॅण्डवॉश व सॅनिटायझरचा वारंवार वापर करण्याचे दुकानदारांना सुचवून फिजिकल डिस्टन्स पाळण्याचे आवाहन महापालिकेने केले. उल्लंघन करणाऱ्यावर प्रथम एक हजार रुपये दंड, नंतर गुन्हे दाखल करण्याचे संकेत महापालिकेने दिले. लॉकडाऊन काळात पोलीस व पालिका अधिकारी लक्ष ठेवून असून, गेल्या आठवड्यात दोन मॅरेज हॉलवर महापालिका अधिकाऱ्यांनी दंडात्मक कारवाई केली आहे. चौकाचौकांत पोलीस व महापालिका कर्मचारी मास्कविना फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करीत आहेत.