निर्बंध शिथिल होताच नो एंट्री धाब्यावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:27 AM2021-06-17T04:27:13+5:302021-06-17T04:27:13+5:30
डोंबिवली : स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरातील मुख्य चौकांमध्ये उभारलेल्या सिग्नल यंत्रणेला अद्याप मुहूर्त मिळालेला नसताना, नो एंट्रीच्या नियमांना वाहनचालकांकडून ...
डोंबिवली : स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरातील मुख्य चौकांमध्ये उभारलेल्या सिग्नल यंत्रणेला अद्याप मुहूर्त मिळालेला नसताना, नो एंट्रीच्या नियमांना वाहनचालकांकडून तिलांजली दिली जात आहे. नो एंट्री नियमांची काटेकोर अंमलबजावणी होण्याकडे वाहतूक पोलिसांचेही दुर्लक्ष झाल्याने मुख्य रस्त्यांवर वाहतूककोंडीची समस्या उद्भवत आहे.
कोपर रेल्वे उड्डाणपूल धोकादायक झाल्याने हा पूल वाहतुकीसाठी १५ सप्टेंबर २०१९ पासून बंद करण्यात आला आहे. कमकुवत झालेला पूल बंद करा, असे पत्र केडीएमसीकडून वाहतूक पोलीस विभागाला मिळताच तत्काळ पूल बंद करीत शहरातील वाहतूक बदलाची अधिसूचना त्यांच्याकडून जाहीर करण्यात आली. डोंबिवली पूर्व-पश्चिम जाणारी वाहतूक ठाकुर्ली उड्डाणपुलावरून मार्गस्थ केल्याने या पुलाच्या आजूबाजूचे बहुतांश रस्ते एकदिशा मार्ग करून वाहतुकीचे नियमन सुरळीत चालू ठेवले आहेत. दरम्यान, कोरोना रुग्णांची संख्या कमी होताच लादण्यात आलेले निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. निर्बंध शिथिल होताच रस्त्यांवर वाहनांची प्रचंड गर्दी वाढली आहे. यात वाहतुकीच्या नियमांचे पालन केले जात नसल्याने वाहतूककोंडीच्या समस्येत अधिकच भर पडली आहे. नियम मोडणाऱ्या वाहनांकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याने अधिसूचना जाहीर करून काय साधले, असेच काहीसे चित्र मुख्य चौकांमध्ये दिसत आहे.
या ठिकाणी हाेतेय उल्लंघन
ठाकुर्ली उड्डाणपुलावर मंजुनाथ विद्यालयाकडून नो एंट्री असतानाही त्याठिकाणाहून सर्रास वाहने चालविली जात आहेत. त्याचबरोबर मशाल चौकातून उलट्या बाजूने वाहने येत असल्याने सकाळी आणि संध्याकाळी ऐन गर्दीच्यावेळी वाहतूककोंडीची समस्या त्याठिकाणी दिसून येते. बाजीप्रभू चौकातून मदन ठाकरे चौकाच्या दिशेने वाहने येण्यास मनाई असताना त्याचेही उल्लंघन सर्रास होत आहे, तर ठाकुर्ली उड्डाणपुलाला जोडणाऱ्या जोशी हायस्कूल रोडवरही नो एंट्रीचे नियम धाब्यावर बसविले जात असल्याने त्याठिकाणी वाहनांचा गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळते.
---------------------