ठाणे शहरात उद्या मालवाहतूक वाहनांना नो 'एन्ट्री'; देवी मूर्ती विसर्जनासाठी वाहतूकीत बदल
By जितेंद्र कालेकर | Published: October 4, 2022 05:20 PM2022-10-04T17:20:14+5:302022-10-04T17:20:27+5:30
ठाण्यातील शहरच नव्हे तर जिल्ह्यातील ग्रामीण भागातही २६ सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवाला धुमधडाक्यात सुरुवात झाली.
ठाणे - यंदा गणेशोत्सवापाठोपाठ नवरात्रोत्सवही मोठया उत्साहात साजरा झाला. त्यामुळेच बुधवारी विजयादशमीला देवीच्या मूर्तीची विसर्जन मिरवणूकही त्याच जल्लोषात वाजत गाजत निघणार आहे. त्यामुळे मिरवणूकीमुळे शहरात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांनी आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातून जाणाऱ्या जड आणि अवजड मालवाहतूकीला बुधवारी दुपारी २ वाजल्यापासून विसर्जन मिरवणूक संपेपर्यत प्रवेश बंद केला जाणार असल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली.
ठाण्यातील शहरच नव्हे तर जिल्ह्यातील ग्रामीण भागातही २६ सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवाला धुमधडाक्यात सुरुवात झाली. बुधवारी देवी मूर्तीच्या विसर्जनाच्या मिरवणूकांचे मोठया प्रमाणात आयोजन केले आहे. जिल्हयातून तीन राष्ट्रीय महामार्ग आणि एक राज्य महामार्ग जातो. या महामार्गावरून बाहेरील राज्यांमध्ये जाणाऱ्या तसेच बाहेरील राज्यांतून येणाऱ्या वाहनांची वाहतूक सुरु असते.
माल वाहतूक वाहनांमुळे मिरवणूकीच्या दरम्यान मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यत असते. त्याच पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ठाणे शहर वाहतूक विभागातील अंतर्गत मार्गांवर मालवाहतूक करणाऱ्या मोठया वाहनांना प्रवेश बंद केला (नो एन्ट्री) आहे. पोलीस आयुक्त जयजित सिंह यांनी काढलेल्या अधिसूचनेनुसार ५ ऑक्टोबर रोजी दुपारी २ ते देवी मूर्तींचे विसर्जन होईपर्यंत या वानांना प्रवेश बंदी राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.